esakal | तरुणींना नाडणारा महाठक अखेर गजाआड; डॉक्टर, वकील, पोलिस तरुणींसह अनेकींची फसवणूक 
sakal

बोलून बातमी शोधा

youth arrested by Rabale police in Navi Mumbai

एकाच वेळी अनेक तरुणींबरोबर प्रेमाच्या आणाभाका खात त्या सगळ्यांचेच शारीरिक,आर्थिक आणि मानसिक शोषण करण्याची चटक त्याला लागलेली होती. अशा प्रकारे त्याने आतापर्यंत वीस ते पंचवीस तरुणींची घोर फसवणूक केली.

तरुणींना नाडणारा महाठक अखेर गजाआड; डॉक्टर, वकील, पोलिस तरुणींसह अनेकींची फसवणूक 

sakal_logo
By
दीपा कदम - सकाळ न्यूज नेटवर्क

लखोबाच्या काळ्या लीला - १ 
मुंबई - विवाहीत असूनही स्वतःला कधी अविवाहीत, तर कधी घटस्फोटित, तर कधी घटस्फोट घेण्याच्या मार्गावर असल्याचे भासवायचे. विवाहविषयक (मॅट्रिमोनियल) संकेतस्थळांवर तशी माहिती भरायची आणि मग सुशिक्षित, नोकरदार तरुणींना जाळ्यात अडकवायचे, ही त्याची कार्यपद्धती होती. एकाच वेळी अनेक तरुणींबरोबर प्रेमाच्या आणाभाका खात त्या सगळ्यांचेच शारीरिक, आर्थिक आणि मानसिक शोषण करण्याची चटक त्याला लागलेली होती. अशा प्रकारे त्याने आतापर्यंत किमान वीस ते पंचवीस तरुणींची घोर फसवणूक केली असून, त्यात डॉक्टर, वकील, पोलिस, इंजिनिअर, एचआर हेड अशा तरुणींचा समावेश असल्याचे समोर आले आहे. 

मॅट्रिमोनियल साइट्सवरील तरुणींच्या विश्वासाचा, त्यांच्या भोळेपणाचा आणि वैयक्तिक वा घरगुती समस्यांचा गैरफायदा उठविणाऱ्या या विकृत तरुणाला नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी नुकतीच अटक केली. या आधुनिक ‘लखोबा लोखंडे’चे नाव आहे सचिन पाटील ऊर्फ सचिन सांगळे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

वेगवेगळी रूपे घेऊन महिलांना फसविणाऱ्या, त्यांच्या संपत्तीवर डल्ला मारणाऱ्या एका महाठकाची कहाणी दिवंगत ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांनी आचार्य अत्रेंच्या नवयुग साप्ताहिकातून जगासमोर आणली होती. आचार्य अत्रेंनी त्यावरच ‘तो मी नव्हेच’ हे नाटक लिहिले. लखोबा लोखंडे हे त्या ठकाचे नाटकातील नाव. सचिन पाटील हाही लखोबाप्रमाणेच रूपे बदलत होता. फरक एवढाच की चेहरेपट्टी वा व्यवसाय बदलण्याऐवजी तो स्वतःचा वैवाहिक दर्जा बदलत होता. त्यासाठी त्याने दोन मॅट्रिमोनियल साइटवर खाते उघडलेले होते. त्या माध्यमातून त्याने किमान तीन हजार १०० तरुणींशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. दिसायला देखणा, रसायनशास्त्रामध्ये एम. एससी. आणि मार्केटिंग एम.बी.ए., एका जपानी कंपनीत सेल्स मॅनेजरचे पद, पगार पाऊण लाखाच्या आसपास. अविवाहीत वा घटस्फोटित असलेल्या या लखोबाच्या मोहजालात लग्नाळू मुली सहज अडकत असत. अशाच प्रकारे त्याच्या जाळ्यात अडकलेल्या, त्यामुळे स्वतःच्या जिवावर बेतलेल्या एका वकील मुलीला मात्र त्याचा संशय आला आणि तिने पोलिसांत तक्रार केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सुरुवातीला हे नेहमीचेच, तुटलेल्या प्रेमसंबंधाचे प्रकरण म्हणून पोलिसांनी दुर्लक्ष केले. परंतु त्या वकील मुलीने त्या विकृताला धडा शिकविण्याचा निर्धारच केला होता. लग्न करू या, असे सांगत त्याने तिला चांगलेच गुरफटून टाकले होते. प्रेमळपणे वागून, लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिला शरीरसंबंधांनाही तयार केले होते. त्यातून तिला दिवस गेले. तेव्हा त्याने तिला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या. त्याचा दुष्परिणाम झाला. तिला रक्तस्राव होऊ लागला. तो थांबेना, तेव्हा त्याने तिला ठाण्यातील एका मॅटर्निटी होममध्ये दाखल केले. तेथे स्वतःची ओळख तिचा नवरा अशी करून दिली. त्यानंतर, लग्नाशिवाय अंगाला हात लावायचा नाही, असे त्या मुलीने बजावल्यावर तो तिला टाळू लागला. तेव्हा तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. तो मूळचा पालघर जिल्ह्यातील. तेथे तिने त्याची चौकशी केली. आणि हळूहळू जे समजले त्याने तिचे विश्वच उलटेपालटे झाले. 

आता हे प्रकरण धसास नेण्याचा निर्धार तिने केला आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी सचिन पाटील ऊर्फ सांगळेला २३ जूनला पालघरमधून अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी दिली आहे. 

तक्रार नोंदविण्यासाठी पुढे या 
रबाळे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम निंबाळकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. ‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले, सोळा मुली येऊन भेटल्या आहेत. प्रत्यक्षात तक्रार करण्यासाठी दोन-तीन जणी पुढे आल्या आहेत. आरोपीने खूप जणींचे शोषण केले असल्याचे तपासात दिसून येत आहे. तक्रार करण्यासाठी संबंधित मुलींनी पुढे यावे. त्यांच्या गोपनीयतेची काळजी घेतली जाईल, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

(आधुनिक लखोबाची ‘मोडस ऑपरेंडी’ : वाचा - उद्याच्या अंकात.)