'झेडपी'त पै-पाहुण्यांचीच 'चांदी'

'झेडपी'त पै-पाहुण्यांचीच 'चांदी'

मुंबई - राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांच्या निवडीत विविध पक्षांतील नेत्यांनी आपल्याच घरांतील नावे पुढे आणल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक विचारांना बगल देत स्थानिक नेत्यांनी सोयीनुसार आघाड्या करत सत्ता हस्तगत केली. त्यामुळे कट्टर प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांच्या गळ्यांत गळे घातल्याचे नवेच चित्र सामोरे आले.

पारंपरिक विचारांची शिदोरी घेऊन पक्षीय राजकारणाच्या परंपरेचा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकांत पुरता इस्कोट झाला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या राजकारणाने सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे मनसुबे उधळून लावत कुरघोडी केली. यामुळे भाजप-कॉंग्रेस हे कट्टर प्रतिस्पर्धी सोयीनुसार विरोधात, तर काही जिल्हा परिषदांत गळ्यात गळे घालून सत्तारूढ झाले. या सोबतच शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस असे नवे राजकीय समीकरणही काही जिल्हा परिषदांत समोर आल्याने भाजपला एकाकी पडावे लागले.

विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे हे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी नगर जिल्हा परिषदेच्या दुसऱ्यांदा अध्यक्षा झाल्या. नगरमध्येच माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या पत्नी राजश्री या उपाध्यक्ष ठरल्या.

संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची पुतणी व दिवंगत खासदार साहेबराव डोणगावकर पाटील यांच्या सून देवयानी डोणगावकर या औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. कोल्हापुरात आमदार अमल महाडिक यांनी त्यांच्या पत्नी शौमिका यांनाच अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसविले. महाडिक यांच्या घरात एक खासदार, एक आमदारपद, एक माजी आमदार आणि आता जिल्हा परिषद अध्यक्षपद अशी पदे आली आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कन्या आदिती रायगड जिल्हा परिषदेची अध्यक्षा झाली. शिवाय तटकरे कुटुंबाकडे तीन आमदारपदे आहेतच.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दुसरे नेते माजी खासदार पद्मसिंह पाटील यांची सून आणि आमदार राणा जगजितसिंग यांच्या पत्नी अर्चना पाटील या उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा झाल्या. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे बंधू अनिरुद्ध हे जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनले. माजी मंत्री राजेश टोपे यांचे बंधू सतीश हे जालना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ठरले. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक यांना पुणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी संधी मिळाली. सांगलीत माजी आमदार दिवंगत संपतराव देशमुख यांचे चिरंजीव संग्रामसिंह यांना लाल दिव्याची गाडी मिळाली. येथे शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास हे उपाध्यक्ष झाले. सोलापूरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांचे बंधू संजय शिंदे हे अध्यक्षपदी विराजमान झाले. नाशिक जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी आमदार निर्मला गावित यांच्या कन्या नयना गावित या निवडून आल्या. माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री माणिकराव गावित यांच्या नयना या नात आहेत. नांदेडमध्ये माजी आमदार व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माधव जवळगावकर यांच्या आई शांताबाई अध्यक्षा झाल्या.

देवयानी डोणगावकरांचा असाही वारसा!
देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर या औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून आज निवडून आल्या. त्यांचे पती कृष्णा पाटील हे जिल्हा परिषद सदस्य होते. सासरे व माजी खासदार दिवंगत साहेबराव पाटील डोणगावकर हेही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या सासूबाई इंदुमतीताई या उपाध्यक्षा होत्या. त्यांचे आजे सासरे कचरू पाटील हे लोकल बोर्डाचे सदस्य होते. देवयानी यांचे आजोबा रामराव पाटील भामरे हे धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. वडील सुरेश भामरे हे धुळे जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष होते. आई मंगला या सदस्या होत्या. त्यांचे चुलते सुभाष भामरे हे संरक्षण राज्यमंत्री आहेत.

पारंपरिक विचारांचा "इस्कोट'
पारंपरिक विचारांची शिदोरी घेऊन पक्षीय राजकारणाच्या परंपरेचा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदांच्या निवडणुकांत पुरता इस्कोट झाला. स्थानिक कार्यकर्त्यांच्या राजकारणाने सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे मनसुबे उधळून लावत कुरघोडी केली. यामुळे भाजप-कॉंग्रेस हे कट्टर प्रतिस्पर्धी सोयीनुसार विरोधात, तर काही जिल्हा परिषदांत गळ्यात गळे घालून सत्तारूढ झाले. या सोबतच शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस असे नवे राजकीय समीकरणही काही जिल्हा परिषदांत समोर आल्याने भाजपला एकाकी पडावे लागले. या निवडणुकांत पक्षांच्या नेत्यांना मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला. प्रत्येक पक्षानेच स्वपक्षीय राजकीय विचारधारेला बगल देत सोयीच्या आघाड्या केल्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी नाशिकमध्ये डाव्या पक्षाच्या पाठिंब्यासाठी सीताराम येचुरींना विनंती केली तरीही नाशिकच्या तीनही डाव्या सदस्यांनी शिवसेनेला साथ दिली. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी शिवसेना-कॉंग्रेस-डावे असे समीकरण समोर आले, तर उस्मानाबादेत पारंपरिक विरोधक राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपच्या सोबतीने सत्ता स्थापन केली. यवतमाळमध्ये कॉंग्रेस व भाजप अशी अनाकलनीय युती झाली. जालन्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाच शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने धोबीपछाड दिला. बीडमध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या लढाईला स्वपक्षातल्या सुरेश धस यांनीच गनिमी कावा करत पराभव दाखवला.

पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चाणक्‍यनीतीचा प्रभाव कायम ठेवत सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये भाजपची सत्ता आणण्यात महत्त्वाची कामगिरी केली.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रामाणिक आघाडी झाली असती तर आज किमान चौदा ते पंधरा जिल्हा परिषदांत सत्तारूढ भाजप-शिवसेना युतीला मोठे आव्हान मिळाले असते. त्यासोबत शिवसेना-भाजप युती अभेद्य राहिली असती तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातल्या बहुतांश जिल्हा परिषदांतील सत्तेचा फायदा घेता आला असता. मात्र, सर्वच जिल्ह्यांत स्थानिक नेत्यांच्या विरोधातला रोष व पदाधिकाऱ्यांचा आग्रह यामुळे राजकीय विचारधारा बाजूला ठेवत खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांच्या राजकीय बेडीत नेत्यांच्या प्रतिमेवर कुरघोडी झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

जिल्हा परिषदांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष
परभणी - उज्ज्वला राठोड; भावना नखाते (दोघी राष्ट्रवादी)
सोलापूर - संजयमामा शिंदे (भाजप); शिवानंद पाटील
पुणे - अध्यक्ष - विश्वास देवकाते; उपाध्यक्ष- विवेक वळसे पाटील (राष्ट्रवादी)
नाशिक - शीतल सांगले (शिवसेना), नयना गावित (कॉंग्रेस)
कोल्हापूर - शौमिका महाडिक (भाजप), सर्जेराव पाटील (शिवसेना)
सांगली - संग्रामसिंह देशमुख (अध्यक्ष), सुहास बाबर (शिवसेना)
सातारा - संजीवराजे नाईक (राष्ट्रवादी), वसंतराव मानकुमरे (राष्ट्रवादी)
औरंगाबाद - देवयानी डोणगावकर (शिवसेना), केशव तायडे (कॉंग्रेस)
उस्मानाबाद - नेताजी पाटील, अर्चना पाटील (दोन्ही राष्ट्रवादी)
नांदेड - शांताबाई पवार (कॉंग्रेस), समाधान जाधव (राष्ट्रवादी)
हिंगोली - शिवराणी नरवाडे (शिवसेना), अनिल पतंगे (राष्ट्रवादी)
जालना - अनिरुद्ध खोतकर (शिवसेना), सतीश टोपे (राष्ट्रवादी)
नगर - शालिनी विखेपा टील (कॉंग्रेस),
लातूर - मिलिंद लातूरे (भाजप), रामचंद्र तिरुके
बीड - सविता गोल्हार (भाजप), जयश्री मस्के (शिवसंग्राम)
जळगाव - उज्ज्वला पाटील (भाजप), नंदकिशोर महाजन (भाजप)

वर्धा- नितीन मडावी (भाजप), कांचन नंदुरकर (भाजप)
चंद्रपूर- देवराव भोंगळे- (भाजप), कृष्णा सहारे- (भाजप)
बुलडाणा- उमा तायडे- (भाजप), मंगला रायपुरे (राष्ट्रवादी)
यवतमाळ- माधुरी आडे (कॉंग्रेस), श्‍याम जयस्वाल (भाजप)
गडचिरोली- योगिता भांडेकर (भाजप), अजय कंकडालवार (आदिवासी विद्यार्थी संघटना)
अमरावती- नितीन गोंडाणे (कॉंग्रेस), दत्ता ढोमणे (शिवसेना)

रायगड - आदिती तटकरे (राष्ट्रवादी), आस्वाद पाटील (शेकाप)
सिंधुदुर्ग - रेश्‍मा सावंत (कॉंग्रेस), रणजित देसाई (कॉंग्रेस)
रत्नागिरी - स्नेहा सावंत (शिवसेना), संतोष थेराडे (शिवसेना)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com