loksabha election
loksabha electionsakal

यावर्षीच झेडपी, महापालिकांच्या निवडणुका? लोकसभा निवडणुकीसाठी एप्रिलमध्ये येणार ‘EVM’

महापालिका, झेडपीच्या निवडणुका कधी होतील, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. एप्रिल ते मे २०२४ या काळात लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी सोमवारी ‘ईव्हीएम’च्या बॅटऱ्या सोलापुरात आल्या. २६ एप्रिलला ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन येणार आहेत.

सोलापूर : महापालिका, जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून आहे. तोवर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. एप्रिल ते मे २०२४ या काळात लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी सोमवारी (ता. २७) ‘ईव्हीएम’च्या बॅटऱ्या सोलापुरातील रामवाडी गोडावूनमध्ये आल्या आहेत. २६ एप्रिलला ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन येणार आहेत.

मागील लोकसभेची निवडणूक ११ एप्रिल ते १९ मे २०१९ या दरम्यान एकूण ७ टप्प्यांत पार पडली होती. सतराव्या लोकसभेमधील सर्व ५४३ खासदारांची निवड झाली आणि पुन्हा केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आले. आता मे २०२४ मध्ये मोदी सरकारला १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. लोकसभेनंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यासाठी आता पुढील महिन्यात जवळपास २५ हजार ईव्हीएम व तेवढ्याच व्हीव्हीपॅट मशिन दाखल होणार आहेत. व्हीव्हीपॅट व ‘ईव्हीएम’ला बॅटऱ्या जोडून त्या सर्व मशिनची चाचणी केली जाते. लोकसभेची निवडणूक जरी पुढील वर्षी असली, तरीसुद्धा सर्व मशिन्सची पडताळणी करून प्रत्येक तालुक्यात पोच करण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यामुळे आतापासूनच त्याची तयारी सुरु झाली आहे.

लोकसभेपूर्वी झेडपी, महापालिकेची निवडणूक?

राज्यातील एक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीपर्यंत होतील, हे अजूनही स्पष्ट नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दोन टप्प्यात ‘स्थानिक’ निवडणुका होऊ शकतात. पहिल्या टप्प्यात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची निवडणूक होईल. पण, दोन्ही टप्पे सलगच असतील, असेही बोलले जात आहे. निवडणुकीचा सर्व प्रोग्रॅम तयार असून प्रभागरचना, आरक्षणाचीही अडचण असणार नाही. मात्र त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आहे. तरीपण, लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

लोकसभेसाठी २२.४३ लाख तरुण मतदार

जिल्ह्यात सोलापूर व माढा असे लोकसभेचे दोन मतदारसंघ असून दोन्ही मतदारसंघ सध्या भाजपकडे आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात ३६ लाख तीन हजार ५९० मतदार आहेत. त्यात तरुण मतदारांची संख्या लक्षणीय आहे. जिल्ह्यात २२ लाख ४३ हजार ५४७ मतदार हे १८ ते ४९ वयोगटातील आहेत. आगामी निवडणुकांमध्ये या मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

जिल्ह्यात ३५२६ मतदान केंद्रे

लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात तीन हजार ५२६ मतदान केंद्रे असणार आहेत. त्या केंद्रांवर ३६ लाख मतदार मतदान करतील. आता ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन आल्यानंतर त्याची एकमेकांशी जोडणी होईल. त्यासाठी तीन-सहा महिने लागतात. सर्व मशिन पडताळून पाहिल्या जातात. त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्या पाठवल्या जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com