मराठा क्रांती मोर्चा घेणार सरकारविरोधात दीडशे सभा 

राजेभाऊ मोगल
Saturday, 14 September 2019

श्‍वेतपत्रिका काढा 
मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी केलेली आंदोलने आणि त्याअनुषंगाने सरकारने दिलेले आश्‍वासने याबाबत श्‍वेतपत्रिका काढण्यात यावी. अन्यथा, या मागण्याच्या अनुषंगाने सरकारने खुलासा करावा. समाजबांधव जसे शांततेत आंदोलने उभे करू शकतात तसेच ते पुन्हा पेटूनही उठू शकतात, हे सरकारने लक्षात घ्यावे, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

औरंगाबाद - मोठ्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करू, असे कबूल केले होते. मात्र, प्रत्यक्षात समाजाची मोठी फसवणूक केली, हे जनतेला सांगण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आता राज्यभर दिंडी काढणार असून राज्यभर दीडशे सभा घेऊन सरकारला खाली खेचेल, असा निर्धार शनिवारी (ता.14) मराठा क्रांती मोर्चाने येथे पत्रकार परिषदेत केला. 

मूक मोर्चापासून सुरवात झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला. समाजातील संताप लक्षात घेऊन सरकारने मागण्या मान्यही केल्या. मात्र, पुढे समाजाची फसवणूकच केल्याने याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी सांगण्यात आले, की एमपीएससीमधून निवड झालेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना नियुक्‍त करून घेतले जात नाही. यावरूनच सरकारची नियत समोर आली आहे. त्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी गेलेल्या बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींच्या धर्तीवर 50 टक्‍के फीमध्ये सवलत देण्याची घोषणा झाली, पुढे काय? ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबविण्यासाठी काय कारवाई केली, नोकर भरतीमध्ये बिंदुनामावलीचा घोळ करत सरळ सेवा भरतीपासून मराठा तरुणांना जाणीवपूर्वक डावलण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशा विविध मागण्या नुसत्याच मान्य केल्याचे सरकार सांगते. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी चालढकल करीत आहे. त्यामुळे सरकारकडून समाजाची झालेली फसवणूक जनतेसमोर आणण्यासाठी लवकरच जिल्ह्यातून दिंडी सुरू करण्यात येणार आहे. शिवाय, राज्यभरात सरकारच्या विरोधात दीडशे सभा घेतल्या जातील.

या सर्व आंदोलनाचे नियोजन तुळजापूर येथे होणाऱ्या बैठकीत करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी रवींद्र काळे, रमेश केरे, नानासाहेब जावळे पाटील, विजय घाडगे, सोमनाथ पवार, ज्ञानेश्‍वर गायकवाड, भरत कदम, राहुल पाटील, पंजाबराव काळे, किशोर शिरवत, विशाल सूर्यवंशी, अशोक मोरे, किरण काळे, राजेश धुरट, संकेत शेटे, गणेश जगधणे आदींसह समन्वयक उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About Marathakrantimorcha