Ganesh Festival : अबूधाबीतील गणेशोत्सवाला पंधरा हजार भक्तांची मांदियाळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

औरंगाबाद - अबूधाबीत १९७७ मध्ये स्थायिक झालेल्या आठ कुटुंबांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. हे इवलेसे रोप आज गगनाला गेल्याची प्रचिती आली. दीड दिवसाच्या गणरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी यंदा पंधरा हजार भक्तांची गर्दी पाहायला मिळाली.  

औरंगाबाद - अबूधाबीत १९७७ मध्ये स्थायिक झालेल्या आठ कुटुंबांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. हे इवलेसे रोप आज गगनाला गेल्याची प्रचिती आली. दीड दिवसाच्या गणरायाचा आशीर्वाद घेण्यासाठी यंदा पंधरा हजार भक्तांची गर्दी पाहायला मिळाली.  

प्रारंभीला हा उत्सव सभासदांच्या घरी साजरा केला जायचा. कालांतराने दरवर्षी या उत्सवात सहभागी मंडळी वाढत गेली. १९९२ मध्ये महाराष्ट्र मंडळ अबूधाबीची स्थापना झाली आणि गणेशोत्सव साजरा करण्याची जबाबदारी मंडळाने स्वीकारली. गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन उत्सव सभासदांच्या दिवाणखान्यातून हॉटेलच्या सभागृहात साजरा होऊ लागला. गेली काही वर्षे इंडिया सोशल आणि कल्चरल सेंटरच्या भव्य सभागृहात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाच्या कार्यकारिणी समितीने देखाव्यासाठी पर्यावरणपूरक संकल्पना ठरवली. कार्यकारिणी समितीने मुंबईच्या उत्सवी संस्थेकडून रिसायकल्ड कागद आणि पुठ्ठ्यांचा बनवलेला सुंदर देखावा आयात केला.

मुंबईचे प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आणि राजस्थानच्या जयपूर पॅलेसची छटा असलेला हा देखावा भाविकांच्या पसंतीस पडला. शाडूची मूर्ती खास नाशिकहून मागविण्यात आली होती. यंदा भारतासोबतच जपान, रुमानिया आणि पाकिस्तानी नागरिकही दर्शनाला आले होते.

पहिल्या दिवसाच्या दिमाखदार सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अथर्वशीर्षाची सहस्र आवर्तने झाली. उत्तरपूजेनंतर वाजत-गाजत गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. अबूधाबीमधील प्रतिष्ठित व्यक्तींनी आणि भारतीय दूतावासातील मान्यवरांनी आवर्जून महाआरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

ढोल पथकाचे सादरीकरण
दुबईच्या त्रिविक्रम ढोल-ताशा पथकासोबत मंडळातील हौशी कलाकारांचा एकत्रित कार्यक्रम अबूधाबीत झाला. दोन तासांत ढोल-ताशाबरोबरच मिरवणूक, लेझीम, गाण्यांवर नृत्य असा शानदार कार्यक्रम पार पडला. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर ‘भजन भारती’ या दक्षिण भारतीय भाविकांच्या संस्थेने मराठी भजन सादर केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Ganeshotsav Celebration Abu Dhabi