Ganesh Festival : ५९२ गावांत ‘एक गाव-एक गणपती’

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 September 2018

औरंगाबाद - जिल्ह्यातील ५९२ गावांत यंदा ‘एक गाव-एक गणपती’ची स्थापना करण्यात आली. यासाठी ग्रामीण पोलिस आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाने पुढाकार घेतला. 

औरंगाबाद - जिल्ह्यातील ५९२ गावांत यंदा ‘एक गाव-एक गणपती’ची स्थापना करण्यात आली. यासाठी ग्रामीण पोलिस आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाने पुढाकार घेतला. 

जिल्ह्यात एकूण एक हजार ७४९ गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. दरम्यान, ‘एक गाव-एक गणपती’साठी जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात त्यांनी या संकल्पनेबाबत माहिती दिली. गावागावांत एकता अबाधित राहून गणेशभक्तांनी ‘एक गाव-एक गणपती’ संकल्पना अमलात आणावी, असे आवाहन त्यांनी केले. त्याला जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाला. औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे साडेचौदाशे महसुली गावे असून, ग्रामपंचायतींची संख्या ७६२ आहे. त्यात एक हजार ७४९ गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली. त्यांपैकी ५९२ गावांनी ‘एक गाव-एक गणपती’साठी पुढाकार घेतला. या संकल्पनेमुळे गावाचा सलोखा वाढून गणेश मंडळांचे अंतर्गत वाद व गटबाजी टळते.

एकोप्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरत असून, त्यातून गावाचा खर्चही वाचतो. पर्यायाने ही रक्कम अन्य सामाजिक उपक्रमांसाठी उपयोगात आणता येते, अशी ही संकल्पना आहे. महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम अभियानातही या संकल्पनेचा समावेश असून, अभियानाचे मूल्यांकन करणाऱ्या समितीतर्फे असा उपक्रम राबविणाऱ्या गावांना गुणही मिळतात.

गावागावांतील गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. त्यात सर्वांना ‘एक गाव-एक गणपती’ संकल्पना समजावून सांगितली. आवाहनानंतर ही संकल्पना गावात राबविण्यास मंडळांकडून प्रतिसाद मिळाला. गावात एकच गणपती असल्याने जास्त लोक एकत्र येतात. त्यातून एकता वाढते व पैशांचीही बचत होते. 
- डॉ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival Ganeshotsav Ganpati