Maratha Kranti Morcha औरंगाबादमधील ठिय्या तूर्तास स्थगित

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 August 2018

औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी गेल्या 28 दिवसांपासून क्रांती चौकात सुरू असलेला ठिय्या स्वातंत्र्य दिनाच्या सायंकाळी स्थगित करण्यात आला आहे, असे मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीनंतर समन्वयकांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी गेल्या 28 दिवसांपासून क्रांती चौकात सुरू असलेला ठिय्या स्वातंत्र्य दिनाच्या सायंकाळी स्थगित करण्यात आला आहे, असे मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीनंतर समन्वयकांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

मराठा क्रांती मोर्चाची सुरवात जिथून झाली त्या क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी 18 जुलैपासून ठिय्या सुरू होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती थांबवावी, यासाठी हे आंदोलन सुरू केले होते. यात मेगा भरतीला स्थगिती मिळाली असून, आरक्षणावर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्णय देणार असल्याचे सरकारने सांगितले आहे. त्यामुळेच ठिय्या तूर्तास मागे घेत असल्याचे समन्वयकांनी सांगितले.

क्रांती मोर्चाच्या मागण्या
- आंदोलकांरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत
- वाळूजमध्ये हिंसक कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
- निष्पाप लोकांवरील गुन्हे रद्द करावेत.
- अण्णासाहेब पाटील महामंडळाला आर्थिक मदत करावी.
- वसतिगृहासाठी प्रत्येक जिल्ह्यात 20 गुंठे जमीन द्यावी
- शुल्कामधील सवलतींची काटेकोर अंमलबजावणी व्हावी.

लवकरच राज्यव्यापी बैठक
मराठा आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने 10 सप्टेंबरपर्यंत प्रगती अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. राज्य सरकार काय अहवाल सादर करते, त्यानंतर मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल. त्यासाठी राज्यातील समन्वयकांची बैठक 20 दिवसांच्या आतच औरंगाबादेत बोलवण्यात येणार आहे, असे समन्वयकांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha kranti morcha maratha reservation agitation