औरंगाबादेत विधानसभा अध्यक्षांच्या घरापुढे मराठा आंदोलकांचा थाळीनाद 

अतुल पाटील 
Sunday, 5 August 2018

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलने सुरु आहेत. आंदोलकांनी रविवारी सकाळी साडेआठ वाजताच उस्मानपुरा येथील विधानसभा अध्यक्षांचे घर गाठले, थाळीनाद आंदोलन सुरु केले.

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या घरासमोर रविवारी (ता. 5) थाळीनाद आंदोलन झाले. श्री. बागडे तीन तासानंतर आंदोलकांना सामोरे गेले, मात्र आंदोलकांच्या प्रतिप्रश्‍नांना उत्तरे न देताच त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलने सुरु आहेत. आंदोलकांनी रविवारी सकाळी साडेआठ वाजताच उस्मानपुरा येथील विधानसभा अध्यक्षांचे घर गाठले, थाळीनाद आंदोलन सुरु केले. थोड्याच वेळात श्री. बागडे घरातून निघून गेले. आंदोलन, घोषणाबाजी सुरुच होती. यात महिलांसह तरुणांची संख्या मोठी होती. 

श्री. बागडे हे तीन तासानंतर ते पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह घरात आले. मराठा आरक्षणासंबंधी कागदपत्रांची फाईल घेऊन आंदोलकांना सामोरे गेले, यावेळी मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या आयोगांसह केलेल्या कार्यवाहीचा तारखेनिहाय माहिती दिली. तसेच आरक्षण हे भाजपा सरकारच देणार अशी ग्वाही देताना त्यावर माझीच सही असेल, असेही निक्‍क्षुण सांगितले. मात्र, आंदोलकांचे समाधान झाले नाही. साऱ्यांनीच प्रतिप्रश्‍न करायला सुरवात केली. कालबद्ध कार्यक्रमाची विचारणा केली. यावेळी कुणालाही उत्तरे न देता श्री. बागडे वाहनातून पुन्हा बाहेर निघून गेले. आंदोलकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दुपारी एक वाजेपर्यंत थाळीनाद केला. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MarathaKrantiMorcha Agitation in front of home of Speaker of the Assembly