आरक्षण नसल्याने १७ वर्षीय प्रदीपने घेतला जगाचा निरोप 

नवनाथ इधाटे 
Tuesday, 31 July 2018

मंगळवारी (ता. 31) वडोदबाजार (ता. फुलंबी, जि. औरंगाबाद) येथील १७ वर्षीय प्रदीप म्हस्के या तरुणाने विहीरीत उडी मारून जीवनयात्रा संपविली. 
 

फुलंब्री - आयटीआय करण्याची मनामध्ये खुप इच्छा होती. पण केवळ मराठा असल्याने खुल्या प्रवर्गातून प्रदीपचा तिसऱ्या फेरीनंतरही नंबर लागला नाही. त्यामुळेच त्याने जगाचा निरोप घेतला असून तो या व्यवस्थेचा बळी ठरला, अशा शब्दांत हरिदास म्हस्के यांनी आपल्या मुलाच्या बलिदानानंतर दाहकता स्पष्ट केली. 

मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातून सुरु झालेल्या दुसऱ्या टप्यातील आंदोलनाने व्यापक स्वरुप घेतले आहे. त्यानंतर राज्यभरात दररोज कुठे ना कुठे याच मागणीवरून आंदोलने सुरु आहेत. मात्र, सरकार ठोस भूमिका किंवा आरक्षणाची घोषणा करीत नसल्याने आरक्षणाअभावी नोकरी न मिळू शकलेले तरुण आक्रमक झाले आहेत. तसेच काही जणांनी तर बलीदान दिले आहे. हा आकडा आता दिवसागणीक वाढत आहे. सोमवारी (ता. 30) औरंगाबादेत प्रमोद होरे पाटील यांनी रेल्वेखाली उडी मारून आरक्षणासाठी बलिदान दिले. त्यानंतर मंगळवारी (ता. 31) वडोदबाजार (ता. फुलंबी, जि. औरंगाबाद) येथील १७ वर्षीय प्रदीप म्हस्के या तरुणाने विहीरीत उडी मारून जीवनयात्रा संपविली. 

मृतावस्थेत प्रदीपला विहीरीतून बाहेर काढल्यानंतर वडोदबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. यावेळी त्याचे वडील हरिदास म्हस्के म्हणाले, की प्रदीपला आयटीआय करायचे होते. मात्र, तिसऱ्या फेरीनंतरही त्याचा नंबर लागला नाही. त्यामुळे तो खूप निराश होता. आरक्षण मिळालेले असते तर प्रदीपला प्रवेशही मिळाला असता आणि तो आता आमच्यात असता. या व्यवस्थेनेच माझ्या मुलाचा बळी घेतला असल्याचे सांगताना त्यांना अश्रू रोखताही येत नव्हते. ही घटना कळताच फुलंब्री परिसरातील सकल मराठा समाजाने वडोदबाजार येथे धाव घेतली. यामुळे संतप्त झालेल्या समाजबांधवांनी औरंगाबाद-जळगाव मार्गावरील फर्शीफाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून सरकारचा धिक्‍कार केला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one more suicide at fulambri aurangabad of a young boy for reservation