Video : या महापालिकेविरोधात पाच हजार नागरिक का उतरणार आहेत रस्त्यावर ? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

मूलभूत प्रश्‍न सोडविण्यात महापालिका अपयशी ठरल्याने सामाजिक न्याय संघर्ष समितीतर्फे येत्या पाच फेब्रुवारीरोजी सकाळी 11 वाजता साधारण पाच हजार नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत. नागरिक हातात लाठ्या घेऊन त्या उंचावत महापालिकेच्या झोन कार्यावर हा अनोखा मोर्चा काढणार असल्याची माहिती समितीचे प्रवर्तक लहू शेवाळे यांनी मंगळवारी (ता.14) पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद : सरकार कोणाचेही आले तरी महापालिका रस्ते, वीज, पाणी यांसारखे विविध मूलभूत प्रश्‍न सोडविण्यात अपयशी ठरल्याने सामाजिक न्याय संघर्ष समितीतर्फे येत्या पाच फेब्रुवारीरोजी सकाळी 11 वाजता साधारण पाच हजार नागरिक रस्त्यावर उतरणार आहेत. नागरिक हातात लाठ्या घेऊन त्या उंचावत महापालिकेच्या झोन कार्यावर हा अनोखा मोर्चा काढणार असल्याची माहिती समितीचे प्रवर्तक लहू शेवाळे यांनी मंगळवारी (ता.14) पत्रकार परिषदेत दिली. हा मोर्चा मुकुंदवाडी बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून महापालिका ई-वॉर्ड कार्यालयावर जाईल.

हेही वाचा- खासदार इम्तियाज जलील का म्हणाले.. माझी मान शरमेने खाली गेली

समितीतर्फे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की मुकुंदवाडी पोलिस ठाण्यासमोरील रस्त्याचे काम सहा महिन्यांपूर्वी कॉंक्रिटने करण्यात आले. 19 लाखांचे काम केवळ तीन ते चार लाख रुपयांमध्ये उरकल्याचा आरोपही श्री. शेवाळे यांनी केला. याविरोधात नागरिकांनी ई-वॉर्ड कार्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर उपअभियंत्यांनी संबंधित रस्ता आठ दिवसांत पुन्हा नव्याने तयार करून देण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. पत्रकार परिषदेला श्री. शेवाळे यांच्यासह बालाजी शहाणे, रेणुकाबाई मुंडे, गंगुबाई काळे, बाबूराव लहाने, रमेश बोकाडे, कडुबा मिसाळ, भास्कर लहाने आदींची उपस्थिती होती. 

हे वाचलंत का?- थांब्यावरच कळेल, ती सध्या कुठे आहे...

पाच दिवसांतून एकदाच पाणी 
जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असतानाही एन-दोन परिसरातील नागरिकांना पाच दिवसांनंतर एकदा केवळ 50 मिनिटे पाणीपुरवठा होतो. अपुरी जागा, पाणी साठविण्याची क्षमता नसल्याने रहिवाशांना समस्यांना सामोरे जावे लागते. असे असतानाही महापालिकेने 1800 रुपयांवरून 4050 इतकी पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय घेत जनतेची पिळवणूक करण्याचा विडा उचलला आहे का ? असा सवालही उपस्थित करण्यात आला. \

हेही वाचा- तो भररस्त्यात तिला अडवायचा अन्‌ नेहमी म्हणायचा शरीरसुख भोगू दे (वाचा तिने काय...

महापालिकेला हे करावेच लागेल 
मुकुंदवाडी पोलिस ठाण्यासमोरील रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या अभियंत्याला निलंबित करावे, कंत्राटदारांवर कडक कारवाई करावी, भरमसाट पाणीपट्टीवाढीचा निर्णय मागे घ्यावा आदी निर्णय महापालिकेला घ्यावेच लागतील असेही पत्रकात म्हटले आहे. 

क्लिक  करा-आनंदराज आंबेडकर यांनी का निवडला वेगळा रस्ता?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 thausand Citizens gathering for Demonstration opposing of Corporation