समाजाने दिले; पण निसर्गाने नेले : ७० आदिवासी गोंड कुटुंबांवर कोसळले आभाळ

किशोर पाटील 
शनिवार, 28 मार्च 2020

माळीवाडा येथील गायरान जमिनीवर गोणपाटाच्या झोपड्यात वास्तव्यास असलेल्या आदिवासी गोंड समाजाच्या सत्तर कुटुंबांवर कोरोनामुळे संकट कोसळले आहे. संचारबंदीमुळे बाहेर पडता येत नसल्याने आपल्या आजूबाजूला राहणारा हा समाजाचा मोठा घटक उपासमारीच्या विळख्यात सापडला आहे. त्यांची ही व्यथा ‘सकाळने समोर आणली. 

दौलताबाद : माळीवाडा (ता.औरंगाबाद) येथे वास्तव्यास असलेल्या आदिवासी गोंड समाजाच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले असून, यात सामाजिक कार्यकर्ते, संघटना, पोलिस बांधवांचा समावेश आहे. सामाजिक जाणिवेने धान्य व वस्तूंच्या स्वरूपात मिळालेली ही मदत वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने हिरावून नेली आहे. ‘समाजाने दिले; पण निसर्गाने नेले, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 

माळीवाडा येथील गायरान जमिनीवर गोणपाटाच्या झोपड्यात वास्तव्यास असलेल्या आदिवासी गोंड समाजाच्या सत्तर कुटुंबांवर कोरोनामुळे संकट कोसळले आहे. संचारबंदीमुळे बाहेर पडता येत नसल्याने आपल्या आजूबाजूला राहणारा हा समाजाचा मोठा घटक उपासमारीच्या विळख्यात सापडला आहे. त्यांची ही व्यथा ‘सकाळने समोर आणली. 

या सत्तर कुटुंबांच्या मदतीसाठी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने काही दानशूर व्यक्ती, समाजसेवी संघटनांना संपर्क करण्यात आला. त्याला प्रतिसाद देत दौलताबाद पोलिस ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी स्वतः मदत करीत सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला.

समाजसेवक मनोज शिरसाठ, कृष्णा मुळे, विशाल गाजरे, सोमनाथ मुळे, स्वस्त धान्य दुकानदार सुधाकर हेकडे, पंचायत समितीचे माजी सदस्य सर्जेराव चव्हाण, पंचायत समिती सदस्य विजय जाधव, सदस्य सय्यद लैकोद्दीन, शहरातील समाजसेवी कमलेश धूत व त्यांचे सहकारी यांनी अन्नधान्य, फूड पॅकेट आदी मदत केली. या मदतीने आदिवासी बांधव भारावून गेले; पण त्यांचा हा आनंद काही वेळच टिकला.

शुक्रवारी (ता. २७) रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने त्यांच्या झोपड्या उडाल्या. मदतीच्या स्वरूपात मिळालेले अन्नधान्य, वस्तू पूर्णपणे भिजल्या. या सत्तर कुटुंबांतील लहान मुले, पुरुष, महिलांनी चिखलातच रात्र जागून काढली. ही बाब लक्षात येताच ‘सकाळ’च्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क करून अन्नाच्या पॅकेटची मागणी करण्यात आली.

‘सकाळ’च्या शनिवारच्या (ता.२८) अंकात या सत्तर कुटुंबीयांच्या हालअपेष्टांवर प्रकाश टाकून त्यांना मदतीचे आवाहन करण्यात आले. श्री. कटारिया यांनी शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्या सहकाऱ्यांसह येऊन अन्नाच्या पॅकेटचे वाटप केले. 

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष देण्याची मागणी 

दरम्यान, या सत्तर कुटुंबीयांचा प्रश्न जटिल बनला असून, याकडे स्वतः जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे. जोपर्यंत संचारबंदी आहे तोपर्यंत तोपर्यंत काही व्यवस्था करता येईल का, याविषयी प्रशासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज शिरसाठ, पाड्याचे प्रमुख गोपीचंद कुमरे यांनी केली आहे.

दानशूरांना आवाहन

माळीवाडा (ता. औरंगाबाद) येथे वीस वर्षांपासून पाल टाकून वास्तव्यास असलेल्या आदिवासी गोंड समाजाच्या जवळपास सत्तर कुटुंबांवर संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. गायरान जमिनीवर गोणपाटाच्या झोपडीत ही कुटुंबे राहतात. पुरुष मंडळी कानातील मळ काढून देत, जडीबुटी विकून, तर महिला खारीक-खोबरे विकून रोज छटाक-आदपाव किराणा घेत उदरनिर्वाह करतात. सध्याच्या परिस्थितीत समाजातील दानशूरांनी त्यांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन ‘सकाळ’तर्फे करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Adiwasi Gond Families In Trouble By Rain Coronavirus Lockdown Daulatabad Maliwada Aurangabad