एका किड्याने हलविली अख्खी पाणीपुरवठा यंत्रणा!

माधव इतबारे
Wednesday, 15 July 2020

औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे नळांना अधूनमधून दूषित पाणी येते. अशाच एका घटनेत नागरिकाने नळाच्या पाण्यातून किडा निघाल्याची तक्रार केली. त्यानंतर प्रशासकांनी आदेश दिले अन् अख्खी यंत्रणा हलली. पण एवढे करूनही हाती काहीही लागले नाही.

औरंगाबाद - नळाच्या पाण्यातून किडा आल्याची तक्रार एका नागरिकाने थेट महापालिकेच्या प्रशासकांकडे केली व संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. पाण्यात किडा आला कुठून याचा शोध घेण्याचे आदेश प्रशासकांनी दिल्यानंतर पाइपलाइनला कुठे लिकेज आहे का? याचा शोध पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला़ पण कुठेच दोष आढळला नाही. आता ज्याने तक्रार केली त्याच्या घरीच जाऊन तपासणी केली जाणार आहे. 

हेही वाचा- सोयाबीन उगवलेच नाही, तक्रारी ४९ हजार अन् गुन्हे केवळ ४६! खंडपीठात झाली सुनावणी 

जलवाहिन्या झाल्या जीर्ण 
महापालिकेची पाणीपुरवठा योजना जीर्ण झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तारेवरची कसरत करून अधिकारी शहराला पाणी देत आहेत. त्यात वारंवार तांत्रिक बिघाड येतो. परिणामी शहराला नियमित पाणीपुरवठा होत नाही. शिवाय जुन्या शहरासह सिडको-हडको भागात कमी दाबाने पाणी येत असल्याची नेहमीचीच तक्रार आहे. यातच आता नळामध्ये ड्रेनेजमिश्रित पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक वारंवार करतात. त्यानुसार दुरुस्ती केली जाते. मात्र, नुकतेच नळाच्या पाण्यातून किडा आल्याची तक्रार मुकुंदवाडी भागातील एका नागरिकाने प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्याकडे केली. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला आहे. तरीही प्रशासकांनी या तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानंतर अवघी पाणीपुरवठा यंत्रणाच हलली. 

हेही वाचा- शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत

कुठेच काही सापडले नाही 
प्रशासकांच्या आदेशानंतर कार्यकारी अभियंता किरण धांडे यांच्यासह अधिकाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. जायकवाडी, त्यानंतर फारोळा, नक्षत्रवाडीपर्यंत शोध घेण्यात आला. जलवहिनी कुठे गळते का, आणखी काही समस्या आहेत का, पाण्याचे निर्जंतुकीकरण व्यवस्थित होते की नाही, याचीही पाहणी करण्यात आली. मात्र, कुठेच काही सापडले नाही. दरम्यान, सिडको भागातील पाण्याच्या टाकीवर तपासणी करण्यात आली, मात्र तिथेही काहीच दोष नसल्याने आता ज्याने तक्रार केली, त्याच्या घरीच जाऊन पाहणी करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. एका किड्याने अवघी यंत्रणाच हलविल्याची चर्चा दिवसभर महापालिकेत होती. तसेच दुसरीकडे एका नागरिकाच्या तक्रारीची थेट प्रशासकांनी दखल घेतल्याबद्दल कौतुकही होत होते.

संपादन ः प्रवीण मुके


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After the worm got into the tap water, the water supply system ran away