esakal | मास्क, सॅनिटायझर तर सोडाच पिण्यासाठी पाणीही साधं मिळेना
sakal

बोलून बातमी शोधा

मास्क, सॅनिटायझर तर सोडाच पिण्यासाठी पाणीही साधं मिळेना

कोरोनाच्या संकट काळात ज्या भागात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्या भागात महापालिका आरोग्य विभागाकडून सर्व्हे केला जातो. हा सर्व्हे करताना आशा स्वयंसेविकांचा भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. मात्र त्यांच्याकडे सुरक्षा साधनांची वानवा आहे.

मास्क, सॅनिटायझर तर सोडाच पिण्यासाठी पाणीही साधं मिळेना

sakal_logo
By
शेखलाल शेख


औरंगाबाद: आम्हाला कुटुंब आहे, लेकरं बाळं आहेत. कोरोना पेशंट सापडलेल्या भागात आम्ही सर्व्हेला जातो. जाण्यासाठी वाहन नसते. सर्व्हे करताना मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट सोडा साधं पिण्यासाठी पाणी मिळतं नाही. आम्हाला जीव नाही का? आमचा कोण वाली आहे? ही व्यथा आहे, पीरबाजार आरोग्य केंद्राअंतर्गत असलेल्या आशा स्वयंसेविका शोभा काळे यांची.

कोरोनाच्या संकट काळात ज्या भागात कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्या भागात महापालिका आरोग्य विभागाकडून सर्व्हे केला जातो. हा सर्व्हे करताना आशा स्वयंसेविकांचा भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. मात्र त्यांच्याकडे सुरक्षा साधनांची वानवा आहे. शोभा काळे म्हणाल्या, की माझ्यासोबत पुष्पा पैठणे, पुष्पा शिरसाट, सुवर्णा शिरसाट, सविता सावंत, सुनीता सोनावणे या आशा स्वयंसेविका आहे. आशा स्वयंसेविका प्रकल्प आल्यापासून यामध्ये आम्ही आहोत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या भागात जाऊन आम्ही सर्व्हे करतो.

ज्या भागात आम्हाला जायचे तेथे जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नसते. कित्येक वेळा पायी जावे लागते. रेड झोनमध्ये सर्व्हे करताना मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट द्यायला हवी; मात्र ती मिळत नाही. ज्या भागात असतो तेथे साधं पाणी मिळणे अवघड होतं.

आम्हाला कामाचा मोबदला असतो. चार ते पाच हजार रुपये हातात पडतात. त्यात काय होतं? हे पैसे तर दोन वेळच्या भाकरीसाठी पुरत नाही. माता बालसंगोपनाचे काम करताना परिस्थिती वेगळी होती; मात्र आता कोरोनाच्या परिस्थितीत आम्हाला ही सुरक्षा साधनांची गरज आहे. आम्हाला मदत हवी; पण ती देण्याचा महापालिका, प्रशासन उदासीन दिसते. 

...तर जबाबदारी कुणाची? 

कोरोना रुग्ण आढळून आल्यावर पीरबाजार, समतानगर, पदमपुरा, बन्सीलालनगर भागात जाऊन आम्ही सर्व्हे केला; मात्र आमच्या सुरक्षेकडे कुणीच लक्ष दिले नाही. एखाद्या स्वयंसेविकाला बाधा झाली तर त्याची जबाबदारी कुणाची राहील.

आतापर्यंत माताबालसंगोपन, स्वॉईन फ्लू, डेंगी, कुष्ठरोग, टीबी अशा अनेक वेळा आम्ही सर्व्हे केले. आता कोरोनाच्या काळात आमच्या आरोग्याकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आशा स्वयंसेविकांनी व्यक्त केली. 

go to top