esakal | 'औरंगाबाद महापालिकेने आम्हाला विश्वासात घेतलं नाही' पालिकेत समावेश होण्यास ग्रामपंचायतींचा विरोध

बोलून बातमी शोधा

Aurangabad muncipal}

वाळूज औद्योगिक वसाहतीसह परिसरातील ग्रामपंचायतींचा औरंगाबाद महापालिकेत समावेश करण्याचा मनसुबा सुरू आहे

'औरंगाबाद महापालिकेने आम्हाला विश्वासात घेतलं नाही' पालिकेत समावेश होण्यास ग्रामपंचायतींचा विरोध
sakal_logo
By
रामराव भराड

वाळूज (जि. औरंगाबाद):  वाळूज औद्योगिक वसाहतीसह परिसरातील ग्रामपंचायतींचा औरंगाबाद महापालिकेत समावेश करण्याचा मनसुबा सुरू आहे. हा मनसुबा हाणून पाडण्यासाठी विरोध करत आमची विकास कामे करण्यास आम्ही सक्षम आहोत, आम्ही आमचे स्वातंत्रच बरे. असा एकमुखी सूर काढत वाळूज परीसरातील ग्रामपंचायती एकवटल्या आहेत. विशेष म्हणजे परीसराचा औरंगाबाद महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास कृती समितीच्या माध्यमातून विविध स्वरूपाचे आंदोलन करण्याचाही इशारा  शुक्रवारी (ता.26) रोजी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीचा विस्तार करून ती पोलिस आयुक्तांच्या हद्दीपर्यंत करण्याच्या हालचाली सुरू आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. मात्र हा प्रस्ताव तयार करताना वाळूज परिसरातील एकाही ग्रामपंचायतला ग्रामपंचायतला विश्वासात घेतले नाही, साधे पत्रही याबाबत मिळाले नसल्याचे वाळूज परिसरातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितले.

Corona Updates: उमरग्यात २६ दिवसांत कोरोनाचे ३७ रूग्ण; धोका वाढतोय... तरीही...

औरंगाबाद महानगरपालिकेत वाळूज परिसराचा समावेश करू नये, समावेश केल्यास परिसराचा विकास होण्याऐवजी परिसर भकास होईल. महानगरपालिकेमुळे चिकलठाणा औद्योगिक वसाहतीची जशी गत झाली. तशीच गत वाळूज औद्योगिक वसाहतीची होईल. त्यामुळे वाळूज परिसराचा औरंगाबाद महानगर पालिकेत समावेश करू नये. यासाठी वाळूज परिसरातील ग्रामपंचायती एकवटल्या आहेत. महानगर पालिकेत समावेश करण्याच्या विरोधासाठी वाळूज परिसरातील ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.26) रोजी पत्रकार परिषद घेऊन तीव्र विरोध केला. विशेष म्हणजे हा समावेश टाळण्यासाठी व महानगर पालिकेचा मनसुबा हाणून पाडण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून लढा देण्याचाही निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या पत्रकार परिषदेत वडगाव (को.)-बजाजनगरचे सरपंच सचिन गरड म्हणाले की, वाळूज परीसरातील ग्रामपंचायती विकास करण्यासाठी सक्षम आहेत. औरंगाबाद महानगरपालिकेने प्रथम त्यांचा विकास करावा. आमच्या सहमतीशिवाय समावेश करु नये. यावेळी माजी जि. प सदस्य रामचंद्र कसुरे म्हणाले की, कोरोना महामारीने लोक हैराण आहेत, त्यात हे संकटसमोर आले आहेत. वाळूज परिसराचा महापालिकेत समावेश करू नये. हा लढा लढत असताना कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नका. आपण सर्व जण मिळून लढा देऊ आणि मनपात वाळूज परिसराचा समावेश टाळु.

वडील रागावले म्हणून अल्पवयीन मुलांनी गाठलं थेट पुणे! उदगीरातील बेपत्ता मुले...

वाळूजच्या सरपंच सईदा पठाण या म्हणाल्या की महापालिकेत समाविष्ट करण्याला 
आमचा विरोध असून आमच्या गावाचा विकास आम्ही करू. तर पंढरपूरचे माजी सरपंच शेख अक्तर यांनी सांगितले की, गावाचा विकास करायचा असेल तर महापालिकेत समावेश करू नये. असे केल्यास आंदोलन करावे लागेल. तिसगावचे उपसरपंच नागेश कुठारे यांनी सांगितले की, शासनाने याचा पुनर्विचार करावा, ग्रामीण भागाच्या विकाससाठी ग्रामपंचायत महत्त्वाची आहे. त्यामुळे वाळूजला औरंगाबाद महापालिकेत घेऊ नये.

यावेळी वळदगावचे माजी सरपंच कांतराव नवले, उपसरपंच संजय झळके, पाटोदाचे उपसरपंच कपेंद्र पेरे, तीसगावचे संजय जाधव, महेबूब चौधरी आदींनी मतं व्यक्त करत महापालिकेत समावेशाला विरोध केला. यावेळी तीसगावचे ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब बुट्टे, बाबासाहेब धोंडरे, कैलास हिवाळे, रोहित राऊत, सुनिल काळे, महेंद्र खोतकर, विष्णू खेडकर, गणेश बिरंगळ, राजेश कसूरे, किशोर खांडरे, सतीश पवार, आदील चौधरी आदी उपस्थित होते.

(edited by- pramod sarawale)