पाकिस्तानातून परतलेल्या हसीना यांचा मृत्यू; मृत्यूपूर्वी नोंदविला होता जबाव

hasina1
hasina1

औरंगाबाद: पाकिस्तानच्या कारागृहातून तब्बल १६ वर्षांनंतर सुटका होऊन मायदेशी परतलेल्या ६५ वर्षीय हसीना दिलशाद अहमद यांचे घर व भूखंड माफियाने बळकावले. हा धक्का सहन न झाल्याने त्यांनी सोमवारी (ता.आठ) मध्यरात्री अडीचच्या सुमारास अखेरचा श्‍वास घेतला. जवळपास दोन दशके वर्षे फरपट झाल्यानंतर हक्काचे घर मिळण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. विशेष म्हणजे, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी दुपारी त्यांची भेट घेऊन जवाब नोंदवला होता.

रशीदपुरा भागातील हसीना दिलशाद अहमद यांनी २००० मध्ये रशीदपुरा येथे सिटी सर्व्हे क्र. ११४२४ मध्ये तीन क्रमांकाचा प्लॉट घेऊन त्यावर विटांचे बांधकाम केले होते. चार वर्षांनंतर २००४ मध्ये त्या पतीच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी लाहोर येथे गेल्या होत्या. तेथे पासपोर्ट हरवल्याने त्या अडचणीत आल्या. त्यांना पाकिस्तानी पोलिसांनी भारतीय गुप्तहेर असल्याचा आरोप लावत अटक करून कारागृहात डांबले होते.

तब्बल १८ वर्षांनंतर सिटी चौक पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांची पाकिस्तानातील कारागृहातून सुटका करण्यात आली होती. शहरात परतल्यानंतर त्यांच्या हक्काचे घर रशीदपुरा येथील हाफिज मुश्ताक अहमद याने बळकावल्याचे दिसून आले. मुश्ताकने जुने घर पाडून त्यावर दुमजली इमारतही बांधली होती.

पोलिसांत दिली होती तक्रार- 
हाफिज मुश्ताक अहमद याने हसीना यांचे जुने घर पाडून त्यावर दुमजली इमारत बांधल्याने त्यांनी पोलिस आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली होती. तसेच आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेटही घेतली होती. यावर आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती गठित करून प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. हक्काचे घर मिळणार की नाही, जिवंत असेपर्यंत आपण त्या घरात जाणार का? अशा प्रश्नांनी त्यांना ग्रासले होते. याच तणावातून सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हृदयविकाराने त्यांचे निधन झाले, असे त्यांचे मानसपुत्र (भाचा) जैनुद्दीन चिश्ती यांनी सांगितले. त्यांच्यावर फाजलपुरा येथील पीर गैब दर्गा कब्रस्तानात मंगळवारी (ता.नऊ) दुपारी दफनविधी करण्यात आला.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com