esakal | 'आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत एकही नोकर भरती होऊ देणार नाही', मराठा ठोक मार्चाचा पावित्रा
sakal

बोलून बातमी शोधा

maratha thok morcha

मराठा क्रांती ठोक मार्चातर्फे क्रांतीचौकात आंदोलन. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत सोडले

'आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत एकही नोकर भरती होऊ देणार नाही', मराठा ठोक मार्चाचा पावित्रा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे मराठा युवक, विद्यार्थी व मराठा समजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी (ता. ६) सकाळी अकरा वाजता क्रांती चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जमलेले असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारविरुद्ध घोषणा दिल्या. दरम्यान काही आंदोलकांना क्रांती चौक पोलिसांनी ताब्यात घेत नंतर सोडून दिले.

नोकरभरती होऊ देणार नाही-

मराठा आरक्षणाविरोधातील स्थगिती जोपर्यंत उठत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात नोकरभरती व परिक्षा होऊ देणार नसल्याचा ठोक मार्चाचा पावित्रा आहे. तसेच ‘एसईबीसी’ आरक्षणातून मराठा समाजातील उमेदवारांना तात्काळ शासकीय नोकरीत सामावून घ्यावे ही मागणी केली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे प्रक्षोभक भाषण करुन मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहेत, असा आरोपही ठोक मोर्चाकडून प्राप्त निवेदनात करण्यात आला.

Crime News: मुलीकडे एकटक बघणाऱ्यास ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा

कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी-

कोपर्डी घटनेतील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतीगृह उभारावे. सर्वोच्च न्यायालयात केंद्र व राज्य सरकारने लक्ष घालून वकिलामार्फत भक्कम बाजू मांडून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे आदी मागण्या मराठा मोर्चातर्फे करण्यात आल्या.

सावधान! डी - मार्टच्या फेक लिंकवर क्लिक कराल तर होऊ शकतं नुकसान

यावेळी मोठ्या संख्येने ठोक मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते गोळा झाली. झेंडे हाती घेत त्यांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ या घोषणा दिल्या. पोलिसांनी काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यात महिला कार्यकर्त्यांचाही समावेश होता. काही वेळाने त्यांना सोडण्यात आलं.

(edited by- pramod sarawale)