आईवडीलांच्या भांडणाला कंटाळून थेट दोघी बहिणींनी सोडलं घर; पोलिसांच्या चौकशीनंतर सर्व प्रकार समोर

सुषेन जाधव
Thursday, 21 January 2021

वडील सतत दारूच्या नशेत तर्रर्र. घरात केवळ आई कमावते. त्यामुळे आईवडील भांडणं करतात आणि मुलींवर राग काढतात....

औरंगाबाद : ‘स्वराली’ अन् ‘निराली’ (नावे बदलली आहेत) या दोघी बहिणी सातारा परिसरात राहतात. दोघींचेही बारावी शिक्षण झालेले. वडील सतत दारूच्या नशेत तर्रर्र. घरात केवळ आई कमावते. त्यामुळे आईवडील भांडणं करतात आणि मुलींवर राग काढतात. त्यामुळे एक दिवस दुपारी आईवडिलांच्या वादाला कंटाळल्या होत्या. शेवटी दोघींनी थेट बसमध्ये बसून नाशिक गाठले. मात्र, शहरातील सातारा आणि नाशिक पोलिसांच्या मदतीने त्यांना औरंगाबादेत आणून आईवडिलांसह समुपदेशन करत घरी पाठविण्यात आले.

‘स्वराली’ आणि ‘निराली’ यांना सात वर्षांची एक लहान बहीणही आहे. सोमवारी (ता. १९) त्यांची आई कंपनीत कामाला गेली तर वडील दोन तीन दिवसांपूर्वी गावाला गेले होते. दोघी बहिणींनी सात वर्षांच्या लहान बहिणीला बाहेर चाललो म्हणत कपडे, दोन हजार रुपये घेऊन घराबाहेर पडल्या ते थेट बसस्थानकावर आल्या. कुठे जायचे माहीत नव्हते; पण बसस्थानकावर थेट एका बसमध्ये बसल्या. बस निघाल्यानंतर ही बस नाशिकला जात असल्याचे त्यांना समजले. दोघी बहिणींनी नाशिकचे तिकीट घेऊन सायंकाळी पाच वाजेदरम्यान नाशिकला पोचल्या. सोबत मोबाईल आणला होता. मात्र, घरच्यांनी कॉल करूनही दोघींनी घेतले नाही. 

बसस्थानकावरच थांबल्या- 
दोघी बहिणींना बसमधून उतरल्यानंतर कुठे जावे हे कळेना म्हणून त्या तिथेच बसून राहिल्या. इकडे तिच्या घरच्यांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर औरंगाबाद सातारा पोलिसांनी गंभीर दखल घेतली होती. त्यांनी सायबर पोलिसांच्या मदतीने टॉवर लोकेशन मिळवून नाशिक पोलिसांना कळविले. सरकारवाडा (नाशिक) पोलिसांनी बसस्थानकावर धाव घेत दोघी बहिणींना ताब्यात घेत मुली सुखरूप असल्याचे कळवत त्यांना ठाण्यात घेऊन गेले. औरंगाबादेतून मुलींची आई, पोलिसांचे पथक मंगळवारी (ता. २०) पहाटे तीन वाजेदरम्यान नाशिकला गेले अन् दोघी मुलींना घेऊन आले. 

रागावून गेल्याचा दिला जवाब- 
दोघी बहिणींना औरंगाबादेत आणल्यानंतर पोलिसांनी महिला दक्षता समिती सदस्या श्रीमती वाघ यांच्यासमोर जवाब दिला की, ‘वडील काहीच कमवत नाही, आईच एकटी संसाराचा गाडा ओढते, दोघांची नेहमी भांडणे होतात, त्याचा राग आम्हा भावंडावर काढला जातो’ आम्हाला कोणी पळवून नेले नाही, आम्हीच कंटाळून घर सोडल्याचे दोघी बहिणी म्हणाल्या. दरम्यान, मुलींसह त्यांच्या आईवडिलांचे समुपदेशन करून मुलींना आईवडिलांच्या ताब्यात दिल्याचे उपनिरीक्षक अनिता फासाटे यांनी सांगितले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक डॉ. सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिता फासाटे, दिशा रामगिरवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्या चमूने केली.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad breaking news two girls ran away from home