
अचानक झालेल्या हल्ल्याने भांबवलेल्या शेतकऱ्याने आरडाओरड करून बाजूला पळ काढण्याचा प्रयत्न केला. शेतात गहू असल्याने त्यांना पळता आले नाही.
करमाड (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद तालुक्यातील गेवराई कुबेर येथील शेतकरी आण्णा भाऊराव कुबेर या शेतकऱ्यावर १० ते १२ रानडुकरांनी हल्ला केला. या हल्ल्यात आपले प्राण वाचवण्यात शेतकऱ्याला यश आले असले तरी डुकरांनी त्यांच्या डाव्या हाताचे लचके तोडल्याने हाताच्या तीन नसा तुटल्या असून औरंगाबाद तालुक्यातील खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वाचा - संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे कोणाचाही दबाव मानत नाहीत
गेवराई कुबेर शिवारात गट क्रमांक २३८ येथे शनिवारी (ता.२७) सकाळी ११ च्या सुमारास आण्णा कुबेर हे शेतकरी आपल्या शेळ्यांकडे जाण्यासाठी निघाले असता जाळीत बसलेल्या १० ते १२ रानडुकरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्याने भांबवलेल्या शेतकऱ्याने आरडाओरड करून बाजूला पळ काढण्याचा प्रयत्न केला. शेतात गहू असल्याने त्यांना पळता आले नाही. ते खाली पडले त्याच वेळी एका डुकराने त्यांचा हाताचा लचका तोडला. आरडाओरड ऐकून बाजूला असलेले दीपक, अर्जुन, प्रदीप कुबेर हे तीन तरूण धावत घटनास्थळी आल्याने रानडुकरांनी पळ काढला. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या कुबेर यांना दुचाकीवरून तात्काळ दवाखान्यात हलवण्यात आले.
वाचा - गर्दी पाहून आस्तिककुमार पांडेय जेव्हा भडकतात...
हा हल्ला एवढा भयानक होता की कुबेर त्यांचा हाताचे लचके तोडल्यानंतर पळ काढलेल्या डुकराने हाताचा काही भाग तोंडात ठेऊन पळ काढला. या हल्ल्यात कुबेर यांच्या हाताच्या तीन नसा तुटल्याअसून हात निकामी झालेला आहे. औरंगाबाद येथील खासगी दवाखान्यात शस्रक्रियेद्वारे या नसा जोडण्याचे काम डॉक्टर करत आहे. या शस्रक्रियेसाठी कुबेर यांना लाख ते दीड लाख खर्च येणार असून त्यांना कायमचे अपंगत्व येणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे वन विभागाने आण्णा कुबेर यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी कुबेर यांच्या कुटुंबियांनी केली आहे.
वाचा - औरंगाबाद शहरातील शाळा, शिकवण्या १५ मार्चपर्यंत बंदच
परिसरात दहशत
या अगोदर रात्री शेतात पाणी भरणाऱ्या शेतकऱ्यावर रानडुकरांनी हल्ले केलेल्या अनेक घटना घडलेल्या आहेत. मात्र अशा पद्धतीने दिवसा ढवळ्या आण्णा कुबेर यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे गेवराईसह परिसरात एकच दहशत पसरली आहे. रात्रपाळीत पाणी भरायला जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तसेच दिवसा शेतात पायी जाणाऱ्या महिला व लहान मुलांमध्ये देखील या घटनेने प्रचंड घाबराट पसरलेली आहे. वन विभागाने या रानडुकरांचा तात्काळ कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी गेवराई, बनगाव, जयपूर येथील शेतकरी करित आहेत.
संपादन - गणेश पिटेकर