
पत्नीला चहा ठेवण्यासाठी सांगून बाजूच्या खोलीत ते गेले व परत चहा घेण्यासाठी का येत नाही
जेहूर (जि.औरंगाबाद) : कन्नड तालुक्यातील अंधानेर येथे सोनार व्यवसाय करणाऱ्या तरूणाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवारी (ता.चार) उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे अनिल रणधीर (ता.३४) असे नाव आहे. अनिल याचे तौल्यागड तांडा-कोळवाडी तांडा येथे दुकान आहे. येथे बऱ्याच वर्षांपासून सोनाराचा व्यवसाय तो करत होता.व्यवसायातील कर्जबाजारीपणामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले.
अनिल रणधीर याच्या एक वर्षाच्या मुलीचा पहिला वाढदिवस होता. त्यासाठी त्याने बुधवारी (ता.तीन) सायंकाळी मुलीला ड्रेस आणला होता. पत्नीला चहा ठेवण्यासाठी सांगून बाजूच्या खोलीत ते गेले व परत चहा घेण्यासाठी का येत नाही, म्हणून पाहण्यासाठी पत्नी गेली असता हा प्रकार समोर आला. फाशी घेण्यासाठी स्टूल पडल्याचे आवाज झाल्याने शेजाऱ्यानी धाव घेतली तोपर्यंत अनिलचा मृत्यू झाला होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. अनिल रणधीर हा व्यवसायामध्ये कर्जबाजारी झाला होता.
कन्नड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कन्नड येथील प्राथामिक आरोग्य केंद्रामध्ये पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मूलगा, एक वर्षाची मूलगी असा परिवार आहे.
पाठोपाठ भाऊ, वडिलांचा आधार गेला
एका वर्षापूर्वी अनिल रणधीरच्या भावाचा मृत्यू झाला होता. त्यांना कॅन्सर होता. त्यानंतर वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे अनिल याच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती.
संपादन - गणेश पिटेकर