गंगापूर साखर कारखाना प्रकरणातील आरोपी मोकाटच, कृष्णा डोणगावकरांचा आरोप

सुनिल इंगळे
Tuesday, 2 March 2021

गंगापूर साखर कारखाना प्रकरणातील एकाही आरोपीला अटक न झाल्यामुळे मंगळवारी (ता.२) कृष्णा डोणगावकर यांनी पत्रकार परिषदेत पोलिस तपासाविरोधात नाराजी व्यक्त केली

औरंगाबाद: गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या अपहार प्रकरणातील अद्याप एकालाही अटक झालेली नसून या प्रकरणातील आरोपी मोकाट फिरत आहेत. तसेच यातील मुख्य आरोपी आमदार प्रशांत बंब हे फिर्यादीवर दबाव टाकून त्यांच्यावर पोलिस ठाण्यात खोटे गुन्हे करत असल्याचा आरोप गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे सभासद व माजी चेअरमन कृष्णा डोणगावकर यांनी केला आहे.

गंगापूर साखर कारखाना प्रकरणातील एकाही आरोपीला अटक न झाल्यामुळे मंगळवारी (ता.२) कृष्णा डोणगावकर यांनी पत्रकार परिषदेत पोलिस तपासाविरोधात नाराजी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, गंगापूर सहकारी साखर कारखाना प्रकरणातील १५ कोटी ७५ लाख रुपयांचा अपहार करणाऱ्यांवर तीन महिन्यांपूर्वी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु तीन महिन्यानंतरही एकाही आरोपींना अटक झालेली नाही. या उलट एका महिलेला अटक करून परत सोडून दिले, असा पोलिसांचा तपास सुरू असल्याने मुख्य आरोपी हे साक्षीदारांवर दबाव टाकून साक्ष बदलण्याचे काम होत असल्याचा आरोप यावेळी डोणगावकर यांनी केला.

चाकूर बाजार समितीवर प्रशासक नियूक्तीचा आदेश खंडपीठाकडून रद्द

तसेच श्रीमंत चाफे व संचालक डॉ. गौरक तुपलोढे यांचे बंधू भरत तूपलोढे यांनी माझ्यासह इतर साक्षीदारांवर दमदाटीचा गुन्हा दाखल केला आहे, अशा पद्धतीने साक्षीदार व फिर्यादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न आमदार प्रशांत बंब व त्यांचे कार्यकर्ते करत आहेत. परंतु माझ्या विरोधात केलेला हा गुन्हा खोटा असून यात माझ्यासह फिर्यादी व बंब यांची नार्को ॲनालेसीस टेस्ट करावी व गंगापूर सहकरी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून कारखाना वाचवा, अशीही मागणी डोणगावकर यांनी यावेळी केली.

पुजा चव्हाणचे वडील उतरले शांता राठोडच्या विरोधात; पोलिसांकडे तक्रार

बंब यांच्या मनी लॉन्ड्रिंग विरोधात ईडीत जाणार 
गंगापूर तालुक्यातील सर्व बँका व इतर ठिकाणच्या बँकांतून आ. प्रशांत बंब यांनी खोटी कागदपत्र दाखवून कोटीचे कर्ज घेतले आहे. या मनी लॉन्ड्रिंगमध्ये बंब यांचे हात खोलवर रुतले आहेत. याबाबतची तक्रार ईडीत (सक्तवसुली संचलनालय) दाखल करणार असल्याचे डोणगावकर म्हणाले. तसेच प्रशासकीय अधिकारीही बंब यांच्या दबावाखाली काम करत असल्याचे ते म्हणाले. यावेळी दिलीप बनकर, कामगार युनियनचे अध्यक्ष विठ्ठल कुंजर, शेतकरी संघटनेचे भाऊ पाटील शेळके यांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad crime news Gangapur Sugar Factory case accused Krishna Donagaonkar