मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, एक डिसेंबरला मतदान

मधुकर कांबळे
Monday, 2 November 2020

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणुक आयोगाने सोमवारी (ता.दोन) जाहीर केला. गुरूवारी (ता. पाच) अधिसूचना निघणार आहे, तर एक डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणुक आयोगाने सोमवारी (ता.दोन) जाहीर केला. गुरूवारी (ता. पाच) अधिसूचना निघणार आहे, तर एक डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांचा कार्यकाल १९ जुलै २०२० रोजी संपला आहे. त्यामुळे नवीन सदस्याची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

दहावी, बारावी बहिःस्थ विद्यार्थ्यांच्या अर्ज भरण्याच्या प्रकियेला आजपासून सुरूवात

आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार गुरूवारी (ता.पाच ) निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. उमेंदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख गुरूवारी (ता.१२) आहे. प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया शुक्रवारी (ता.१३) होईल. त्यानंतर मंगळवारपर्यंत (ता.१७) ज्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आहे ते अर्ज मागे घेऊ शकतील. या निवडणुकीसाठी १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळात मतदान होईल. तीन डिसेंबर रोज मतमोजणी होईल.

सात डिसेंबरपूर्वी या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या निवडणूक प्रक्रियेशी संबंधित प्रत्येक व्यक्तिला मास्क वापरणे बंधनकारक करण्यात यावे, निवडणुकीच्या कामांसाठी वापरण्यात येणारा परिसर, खोल्या, प्रवेशद्वार येथे येणाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात यावे, प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात यावे, पूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यात यावे, कोरोना प्रतिबंधासाठी राज्य व केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे असे निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Division Graduate Constituency Election Program Declare