कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज  - पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील (Video)

संदीप लांडगे
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

  •  गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणार
  •  उपद्रवी केंद्रावर पोलिस प्रशासन व शिक्षण विभागाचे बारीक लक्ष
  •  विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात बाहेरच्या भूलथापांना बळी पडू नये

औरंगाबाद - विद्यार्थ्यानी परीक्षेत कॉपी करणे व शिक्षकांनी सामूहिक कॉपीस मदत करणे ही बाब जिल्हा प्रशासन खूप गांभीर्याने घेणार आहे. या वर्षी होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा कॉपी मुक्त, निकोप व पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे आजपासून (ता.17) बारावीची परीक्षा सुरु होत आहे. शिक्षण विभाग, नायब तहसीलदार, तहसीलदार, बीडीओ, यासोबतच सर्व पोलिस यंत्रणा यासाठी सज्ज आहे. जो कोणी परीक्षा केंद्राबाहेर कॉपी संदर्भात संशयीत आढळून येईल, त्यांच्यावर 144 गुन्हा व सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर 353 चा गुन्हा दाखल करण्यात येईल. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना त्रास होईल असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. 

उपद्रवी केंद्रावर पोलिस प्रशासन व शिक्षण विभागाचे बारीक लक्ष असणार असून तीन तास अधिकारी, पोलिस कर्मचारी बसून राहणार आहेत. यासह पोलिस वाहनांची गस्त राहील. त्यामुळे कोणी कॉपी करतील अथावा गैरप्रकाराला समर्थन देतील अशा सर्व संस्थाचालक, केंद्रप्रमुख, केंद्र संचालकांवर कारवाई करण्यात येईल. कॉपी ही आपल्या शिक्षण व्यवस्थेला कमकुवत करते. आपण सर्वांनी मिळून ती वेळीच रोखली पाहिजे. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात बाहेरच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन यावेळी मोक्षदा पाटील यांनी केले. 

हे ही वाचा -  शाळांच्या अनुदानाची वाट मोकळी 

 

""यावर्षी परिक्षा केंद्रावर सी. सी. टीव्ही कॅमेरा चालू स्थितीत असणे सक्तीचे आहे. या वर्षीपासून परिक्षाकेंद्रावर हे बाहेरच्या शाळेचे केंद्र संचालक असणार आहेत. विषय शिक्षक हे आपल्या विषयाच्या परीक्षेच्या दिवशी परिक्षा केंद्रावर उपस्थित राहणार नाहीत, अशा उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.'' 
डॉ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad : HSC exam - Police administration ready for copy case