esakal | औरंगाबादच्या प्रशासकांचा लोकप्रतिनिधींवर पलटवार... म्हणाले, आम्ही काय लहान बाळ आहोत
sakal

बोलून बातमी शोधा

AstikKumar Pandey

विनाकारण गैरसमज पसरविणारे पिल्लू सोडून महापालिकेचे मनोधर्य खच्चीकरण करू नका, समन्वय नसायला आम्ही काय लहान बाळ आहोत का? आएएस अधिकारी आहोत. प्रत्येक निर्णय शहरातील चार अधिकारी बसून घेत आहेत, असा दावा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केला. 

औरंगाबादच्या प्रशासकांचा लोकप्रतिनिधींवर पलटवार... म्हणाले, आम्ही काय लहान बाळ आहोत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून जीवाची पर्वा न करता काम करीत आहेत. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर फक्त शहरातीलच नव्हे तर देशभरातील रुग्णसंख्या वाढत आहे. औषध मिळणार नाही, तोपर्यंत कोरोना मरणार नाही. त्यामुळे विनाकारण गैरसमज पसरविणारे पिल्लू सोडून महापालिकेचे मनोधर्य खच्चीकरण करू नका, समन्वय नसायला आम्ही काय लहान बाळ आहोत का? आएएस अधिकारी आहोत. प्रत्येक निर्णय शहरातील चार अधिकारी बसून घेत आहेत. लोकप्रतिनिधींसोबतही वारंवार संवाद सुरू आहे, असा दावा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शनिवारी (ता. २७) फेसबुक लाईव्हव्दारे नागरिकांसोबत संवाद साधताना केला. 

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे खापर लोकप्रतिनिधींनी प्रशासनावर फोडले होते. अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचा आरोपही खासदार इम्तियाज जलील, भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड, आमदार प्रदीप जैस्वाल, अंबादास दानवे, अतुल सावे, संजय शिरसाट, सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोन दिवसांपूर्वी करण्यात आला होता. मालेगावसारख्या शहरात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे? औरंगाबादेत अधिकाऱ्यांना का जमेना? असा प्रश्‍न इम्तियाज यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देण्यासाठी क्वारंटाईन असताना प्रशासकांनी जनतेशी संवाद साधला. लोकप्रतिनिधींवर पलटवार करताना ते म्हणाले, वेळोवेळी बैठका घेऊन चर्चेतून राज्य-केंद्र शासनाच्या आदेशानुसार कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. 

उदय चौधरी माझे चांगले मित्र 
कोरोनासंदर्भातील सर्व निर्णय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी व मी एकत्र येऊन घेतले. उदय चौधरी दहा वर्षांपासून माझे चांगले मित्र आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही, या आरोपात काहीच तथ्य नाही, असे त्यांनी सांगितले. 
 
औषध नाही तोपर्यंत कोरोना संपणार नाही 
महापालिकेचे मनोबल वाढविण्याचे काम तुमच्याकडून होणार नसेल तर किमान शाप तरी देऊ नका. ते खचले तर तुमच्या कुटुंबियांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येतील. मी काही डॉक्टर नाही पण एवढे सांगू शकतो की जोपर्यंत औषध किंवा लस येणार नाही, तोपर्यंत कोरोना संपणार नाही. यंत्रणा राबविताना काही त्रुटी असू शकतात. तुमच्याकडे काही चांगल्या सूचना असतील तर त्या सूचवा, आम्ही स्वागत करतो. महापालिकेचे काय चुकले असेल तर लस किंवा औषध काढू शकलो नाही, असा चिमटाही पांडेय यांनी काढला.