
औरंगाबाद: कोरोनाचा संसर्ग फिरत्या चित्रपटगृहांनाही झाला आणि यावर पोट असणाऱ्यांचा ‘संसार’ ठप्प झाला. कोरोनामुळे पडदा पडला आणि चित्रपटांची रिळच संपल्याने सुखकर जगण्यालाही खीळ बसली. राज्यात उरलेल्या ४६ फिरत्या चित्रपटगृहांतील सुमारे पाचशेंवर लोक आजही बेरोजगार आहेत; काहीजण पडेल ती कामे करुन जगण्याचा ‘खेळ’ कसाबसा पुन्हा सुरु करू पाहत आहेत. या चित्रपटगृहांना जीवदान व चालकांच्या हाताला काम देण्यासाठी शासनातर्फे पावले उचलण्याची गरज आहे.
फिरती चित्रपटगृहे म्हणजे ग्रामीण जीवनातील मनोरंजनाचा खजिनाच म्हणावा लागेल पण याला सोशल मिडीयाचा डंख झाला व फिरत्या चित्रपट संस्कृतीचा सुवर्णकाळ अस्ताकडे जात आहे. यातच आता राज्यात तीन हजार अशा चित्रपटगृहांपैकी फक्त ४६ फिरते चित्रपटगृहे उरली आहेत. या व्यवसायात विदर्भात व मराठवाड्यातील व्यावसायिकांची संख्या मोठी असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह आहे.
आपलेपणाचा ओलावा अस्सल रांगड्या माणसांनानाच नव्हे तर मेट्रो शहरातील माणसांना विलोभनीय वाटावे अशी ही फिरती चित्रपटगृहे आहेत. पण गत मार्चपासून कोरोनामुळे सर्व क्षेत्रावर बंधने आली. ही बंधने हळूहळू सैलही झाली. नाट्यगृहे, सिनेमागृहांना, चित्रीकरणाला सरकारने संमती दिली. चंदेरी, झगमगत्या दुनियेचे चक्र पुन्हा गतीने फिरत असताना मात्र जत्रा, यात्रांना परवानगीच नसल्याने फिरत्या चित्रपटगृहांची चाके रुतलेलीच आहेत.
आयुष्याचा ‘खेळ’ -
राज्यात ४६ फिरत्या चित्रपटगृहांचे मालक-चालक व एका चित्रपटगृहाचे प्रत्येकी दहा असे ४६० कामगार मिळुन जवळपास ५०० जण आज बेरोजगार झाले आहेत. एका फिरत्या चित्रपटगृहात काम करणाऱ्या आठ ते दहा कामगारांना महिण्याकाठी ८ हजार रुपये दिले जात होते. कामाच्या दिवशी ५० रुपये भत्ता होता. आज मात्र त्यांना काम देणाऱ्या चालक-मालकांचीच अवस्था दयनीय झाली. त्यामुळे आता हे कामगार अपेक्षा कुणाकडून करणार? रोजंदारीवर पोट पण तीच बुडाली आता पोटासोबतच मुलांच्या भविष्याची चिंता सतावत असून शिक्षण व सन्मानजनक जगण्यासाठी त्यांचा ‘खेळ’ सुरु आहे.
जमापुंजी शुन्यात
फिरते चित्रपटगृह चालकांचा वर्षात ८ महिने हंगाम असतो. वर्षाला चार ते पाच लाखांची उलाढाल होते. कामगारांचे वेतन, संमत्या, ‘सरकारी खर्च’ वगळता वर्षाला सव्वा लाखांच्या आसपास या व्यावसायिकांच्या हाती पडत होते. पण आज कोरोनामुळे फिरते चित्रपटगृह बंद असल्याने एक वर्षांपासून त्यांची जमापुंजी काहीच उरली नाही.
‘‘आम्ही रोजगार देत होतो. आमच्यावर दहा जण अवलंबून राहत होते. आता फिरते चित्रपटगृहेच बंद असल्याने ते बेरोजगार झालेच आहेत, शिवाय आता आम्हीच रोजगाराच्या शोधात आहोत. भाजी विक्री करतोय. त्यातून पोटही भरत नाही. कोरोनानंतर अतोनात व्यावसायिक नुकसान झाले. आमच्या फिरत्या चित्रपटगृहाच्या तंबुपासून बांबुपासून सर्व वस्तू सडत आहेत. ते दुहेरी नुकसान सहन करतोय.
-मोहम्मद कासम नवरंगी (चालक, सुमेध टुरींग टॉकीज, चिखली (जि. बुलढाणा)
(edited by- pramod sarawale)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.