ही बाजार समिती शेतकऱ्यांना देणार मोफत दोन लाखांचा विमा

प्रकाश बनकर
शनिवार, 28 डिसेंबर 2019

बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांचा दोन लाख रुपयांपर्यंत मोफत विमा उतरविणार आहे. "पंतप्रधान सुरक्षा विमा योजना'च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुरक्षा कवच मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी विमा उतरविणारी राज्यातील ही पहिली बाजार समिती असणार आहे.

औरंगाबाद : निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना जीवन खडतर असते. याच शेतकऱ्यांना विमा कवच देत त्यांचे जीवन सुखकर करण्याच्या प्रयत्नासाठी औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांचा दोन लाख रुपयांपर्यंत मोफत विमा उतरविणार आहे. "पंतप्रधान सुरक्षा विमा योजना'च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुरक्षा कवच मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी विमा उतरविणारी राज्यातील ही पहिली बाजार समिती असणार आहे. याची प्रक्रिया सुरू झाली असून, शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करावेत असे आवाहन सभापती राधाकिसन पठाडे यांनी केले. 

बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांच्या हिताचे दृष्टीने विविध निर्णय घेण्यात येत आहेत. समितीत सत्तांतर झाल्यानंतर पाच रुपयांत शेतकऱ्यांना "अन्नदाता तृप्ती भोजन योजना' पोटभर जेवण देण्याची योजना राबविण्यात आली. 30 ते 35 हून अधिक शेतकरी नियमित या योजेनेचा लाभ घेत आहेत. या योजनेनंतर शेतकऱ्यांना विमा उतरविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. नवीन वर्षात शेतकऱ्यांना हे नवीन गिफ्ट बाजार समितीतर्फे मिळणार आहे. शेतकऱ्यांची हक्काची बाजारपेठ म्हणून बाजार समित्यांची ओळख आहे. 

हेही वाचा: नोटा बदलून घेण्याची थाप;भामट्यांनी शेतकऱ्याला गंडविले 

शेतकऱ्यांना आवाहन 
मराठवाड्यातील सर्वांत मोठी बाजार समिती असलेल्या शहरातील श्री. छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी अपघात विमा उतरविण्यासाठी नोव्हेंबरच्या महिन्याकाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला होता. त्यास सर्व संचालकांनी हा प्रस्ताव एकमुखाने मंजूर केला. बाजार समितीत शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा दोन लाख रुपयांपर्यंत मोफत अपघात विमा उतरविला जाणार आहे.
हेही वाचा: तिने केला काॅल..नंतर आला मेसज आणि घडले काय

बाजार समिती भरणार विम्याची रक्कम

हा विमा शासनाच्या "न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी'कडून उतरविला जाईल. यासाठी शेतकऱ्यांना एक रुपयादेखील भरण्याची गरज नाही. विम्याची रक्कम बाजार समिती भरणार असून, शेतकऱ्यांना फक्त दोन पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड आणि सातबाऱ्याची सत्यप्रत्य घेऊन 31 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी दाखल करावेत, असेही सभापती पठाडे यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Market Committee will give two lakh insurance cover to farmers