MPSC Exam: परीक्षा नियोजनात गोंधळात गोंधळ; मृत शिक्षकांचीही पर्यवेक्षकपदी नियुक्ती!

mpsc exam
mpsc exam

औरंगाबाद: महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा - २०२० ही रविवारी (ता. २१) होणार आहे. जिल्ह्यातून यासाठी २ हजार १६७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, परीक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेले काही शिक्षक, कर्मचारी मृत, तसेच निवृत्त झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना परीक्षा कामकाजासाठी नियुक्ती दिल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

रविवारी होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेसाठी जिल्‍ह्यातील ५९ केंद्रावरुन १९ हजार ६५६ उमेदवार परीक्षा देणार आहेत. रविवारी सकाळच्या सत्रात १० ते १२ आणि दुपारच्या सत्रात तीन ते पाच दरम्यान परीक्षा होणार आहे. यासाठी २१६७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची राखीव पर्यवेक्षक, समवेक्षक म्हणून परीक्षेच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. परंतू, या परीक्षा कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले काही शिक्षक मृत झालेले आहेत. तर काही शिक्षक कर्मचारी एकवर्षापुर्वीच निवृत्त झालेले आहेत.

तरी देखील या शिक्षक कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परीक्षेच्या कामकाजासाठी रविवारी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. गैरहजर राहणाऱ्या तसेच नियुक्त करण्यात आलेला अधिकारी, कर्मचाऱ्यांऐवजी परस्पर बदली अधिकारी, कर्मचारी हजर राहील्यास सबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे. या अजब आदेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिक्षक संघटनांकडून या आदेशाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 

शोभा महाजन या शिक्षिकेचा एक वर्षापूर्वीच मृत्यू झालेला आहे. तर साधना पाठक या शिक्षिका सहा महिन्यापुर्वीच सेवानिवृत्त झालेल्या आहेत, तरी देखील त्यांची पर्यवेक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. अशा शिक्षकांची नावे यादीमध्ये आल्यास संबंधित कुटुंबाच्या भावना दुखावल्या जातात. प्रशासनाने परीक्षेसाठी नियुक्ती देताना ५३ वर्षापुढील, दिव्यांग तसेच गंभीर आजारी शिक्षक, कर्मचारी व महिला शिक्षकांची नावे वगळण्यात यावे. यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांची मदत घेवून यादी तयार करावी. 
- विजय साळकर, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती 

प्रशासनाला उपलब्ध झालेल्या यादीनुसार परीक्षेसाठी नियुक्तीपत्रे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अशी निवृत्त झालेली किंवा मयतांची नावे आलेली असतील. परीक्षेच्या अनुषंगाने काही कर्मचारी कोरोना संक्रमित किंवा आजारी असल्यास काही नावे वगळतील, म्हणून जास्तीचे आदेश काढण्यात आले आहे. 
-रीता मैत्रेवार, उपजिल्हाधिकारी 

 

(edited by- pramod sarawale) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com