महापालिका निवडणुक : बदल किरकोळ, गडबडी कायम

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

औरंगाबाद- महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप वॉर्डरचनेवर तब्बल ३७० गंभीर स्वरूपाचे आक्षेप आल्यानंतर त्याकडे डोळेझाक करीत राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (ता.२४) वॉर्डरचना अंतिम केली आहे. सुधारणा केल्याचे दाखविण्यासाठी ११५ वॉर्डांपैकी फक्त २८ वॉर्डांच्या सीमारेषा किरकोळ प्रमाणात बदलण्यात आल्या आहेत. हे बदल अशा पद्धतीने करण्यात आले आहेत की, वॉर्डाचे आरक्षण बदलले जाऊ नये, याची काळजी घेण्यात आली आहे. 

औरंगाबाद- महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप वॉर्डरचनेवर तब्बल ३७० गंभीर स्वरूपाचे आक्षेप आल्यानंतर त्याकडे डोळेझाक करीत राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (ता.२४) वॉर्डरचना अंतिम केली आहे. सुधारणा केल्याचे दाखविण्यासाठी ११५ वॉर्डांपैकी फक्त २८ वॉर्डांच्या सीमारेषा किरकोळ प्रमाणात बदलण्यात आल्या आहेत. हे बदल अशा पद्धतीने करण्यात आले आहेत की, वॉर्डाचे आरक्षण बदलले जाऊ नये, याची काळजी घेण्यात आली आहे. 

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी काढण्यात आलेली प्रारूप वॉर्डरचना वादग्रस्त ठरली होती. काही पदाधिकारी व दिग्गज नगरसेवकांचे वॉर्ड सुरक्षित करण्यासाठी निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने प्रगणक गट फिरविले. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निकषही पाळण्यात आले नाहीत. अनेक वॉर्डांची सीमा तब्बल सहा-सहा किलोमीटरची करण्यात आली. गेल्या वेळचे अनेक वॉर्डच गायब करण्यात आले. गेल्या वेळी आरक्षित असलेले काही वॉर्ड पुन्हा आरक्षित झाले तर काही वॉर्ड आरक्षित होणे अपेक्षित असताना ते पुन्हा खुले झाले.

ठळक बातमी : सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय होणार बंद ? 

त्यामुळे या वॉर्डरचनेवर तब्बल ३७० आक्षेप दाखल झाले. या आक्षेपांवर नुकतीच साखर आयुक्त सौरभ राव यांनी सुनावणी घेतली होती. यावेळी आक्षेपकर्त्यांनी वॉर्डरचनेत कसे घोळ झाल्याचे कागदपत्रांच्या आधारावर दाखवून दिले. मोठ्या प्रमाणात गडबडी झालेली असताना राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी वॉर्डरचनेचा अंतिम आराखडा राजपत्रात प्रसिद्ध केला. आराखडा अंतिम करताना त्यात किरकोळ बदल करण्यात आले आहेत. वॉर्डरचना अंतिम करताना २८ वॉर्डांच्या हद्दीत किरकोळ बदल करण्यात आले आहेत. काही प्रगणक गट उचलून ते दुसऱ्या वॉर्डात टाकण्यात आले आहेत. हे करताना आरक्षणात कोणताही बदल होणार नाही, याची काळजी आयोगाने घेतली आहे. 

या वॉर्डांच्या हद्दीत बदल 
भडकल गेट-बुढीलेन, कोतवालपुरा-गरमपाणी, खडकेश्वर, कैसर कॉलनी, मोतीकारंजा-भवानीनगर, समर्थनगर, सिल्लेखाना, भावसिंगपुरा-भीमनगर दक्षिण, नंदनवन कॉलनी-शांतीपुरा, सुरेवाडी, मिसारवाडी, विश्वासनगर-चेलीपुरा, लोटाकारंजा, संजयनगर, इंदिरानगर-बायजीपुरा, अल्तमश कॉलनी, कोटला कॉलनी, क्रांतीनगर-उस्मानपुरा, ठाकरेनगर, कासलीवाल-भाग्योदय वसंतविहार-देवळाई, गोपीनाथपुरम-हरिओमनगर, देवळाई गाव-सातारा तांडा, ज्ञानेश्वर कॉलनी-मुकुंदवाडी, अंबिकानगर, मुकुंदवाडी, वेदांतनगर. 
 
हरवलेल्या वॉर्डांची नावे आली 
अनेक वॉर्डांची नावे प्रारूप वॉर्डरचनेत बदलण्यात आली होती. त्यावरही मोठे आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे अनेक वॉर्डांच्या नावांमध्ये वगळलेल्या वॉर्डांची नावे जोडून समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वॉर्ड क्रमांक ७२ चे नाव विष्णुनगर होते; पण या वॉर्डात विष्णुनगर भागाचा एकही प्रगणक गट नव्हता. त्यामुळे आता या वॉर्डाचे नाव बदलून शिवशंकर कॉलनी-बालाजीनगर असे ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अल्तमश कॉलनी वॉर्डाचे नाव अल्तमश कॉलनी-रहेमानिया कॉलनी, इंदिरानगर-बायजीपुरा वॉर्डाचे नाव इंदिरानगर-बायजीपुरा उत्तर, इंदिरानगर पूर्व वॉर्डाचे नाव इंदिरानगर पश्चिम, सिडको एन-एक वॉर्डाचे नाव एमआयडीसी चिकलठाणा-ब्रिजवाडी, लोटाकारंजा वॉर्डाचे नाव लोटाकारंजा-पंचकुँआ, जयभीमनगर वॉर्डाचे नाव जयभीमनगर-आसेफिया कॉलनी असे करण्यात आले आहे. 

क्‍लिक करा : बेगमपुरा - पहाडसिंगपुरा वॉर्डाला तीर्थक्षेत्राचा दर्जा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Municipal Corporation Election