सातारा-देवळाईतील बेकायदा बांधकामे पाहून भडकले आयुक्त

Aurangabad amc news
Aurangabad amc news

औरंगाबाद- सातारा-देवळाई परिसरात सुरू असलेली बेकायदा बांधकामे, जागोजाग तुंबलेली गटारे, अतिक्रमण पाहून महापालिका आयुक्त आस्तिकुमार पांडेय बुधवारी (ता. २६) अवाक् झाले. आयुक्तांच्या तीन तासांच्या पाहणीत नागरिकांनी रस्ते, ड्रेनेज लाईन, पथदिवे, तुंबलेले पाणी याबाबत तक्रारी केल्या. बेकायदा बांधकामांमुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन यांना तुमच्यावर निलंबनाची कारवाई का करू नये? असा जाब विचारला. 

सातारा-देवळाईचा चार वर्षांपूर्वी महापालिकेत समावेस करण्यात आला. मात्र, या भागातील नागरिक आजही नागरी सुविधांअभावी त्रस्त आहेत. महापालिकेकडे वारंवार मागणी करूनही सुविधा मिळत नसल्याने आता या भागासाठी स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यावर आयुक्तांनी बुधवारी सातारा-देवळाई भागाची पाहणी केली. सकाळी आठपासून देवळाई वॉर्डातील नाईकनगर भागातून आयुक्तांनी पाहणीला सुरुवात केली. या भागात बांधकामे मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरु असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. ग्रामपंचायतीच्या बांधकाम परवानगीचा वापर करून ही बांधकामे सुरू असल्याचे लक्षात येताच आयुक्तांनी नगररचना विभागाचे सहायक संचालक रामचंद्र महाजन आणि उपअभियंता संजय चामले यांना बांधकाम परवानगी देण्यासाठी या भागात कॅम्प लावण्याचे आदेश दिले.

दरम्यान, आयुक्त माउली नगरात गेले. याठिकाणी नाला अडविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या घरासमोर घाण पाणी तुंबले आहे. त्यामुळे महिलांनी तातडीने ड्रेनेज लाईनचे काम करावे, अशी मागणी आयुक्तांकडे केली. त्यावर आयुक्तांनी ड्रेनेज लाईनसाठी १८३ कोटींचा डीपीआर राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. तोपर्यंत पर्यायी व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले. या पाहणीत आयुक्तांना देवळाई वॉर्डातील गट नंबर १०३ मध्ये तातडीने मोकळया जागेची मोजणी करून त्याला तारेचे कुंपण करावे व वृक्षारोपण करावे, अशा सूचना केल्या. देवळाई भागातील जागोजाग सुरु असलेले बेकायदा बांधकामे पाहून आयुक्त संतापले. त्यांनी रामचंद्र महाजन यांना या भागात आपण कधी फिरलात का? बेकायदा बांधकामे सुरु असताना त्यांच्यावर कारवाई का केली नाही? तुमच्यावरच निलंबनाची कारवाई का करु नये असा दम दिला. महाजन जरा अ‍ॅक्टीव्ह व्हा, या भागाचे सर्वेक्षण करून बेकायदा बांधकामांची यादी आठ दिवसात सादर करा, नसता तुमच्यावर कारवाई करेल असा इशारा त्यांनी दिला. 

नाल्यातील गाळ काठावर टाकला 
देवळाई रोडवर एका नाल्यातील व प्लॅस्टिक काढून ते काठावर टाकण्यात आल्याचे पाहून आयुक्त संतापले. नाल्याच्या काठावर पडून असलेला गाळ का उचलला नाही? असा प्रश्‍न त्यांनी घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांना विचारला. भोंबे यांनी गाळ सुकण्यासाठी काठावर ठेवल्याचे सांगितले. त्याच्या या उत्तरावर आयुक्तांनी संताप व्यक्त केला. 

नाल्यावर चार मजली इमारत 
आयुक्तांनी नाल्याची पाहणी केली. एका नाल्यावर झालेले बांधकाम झाल्याचे पाहून आयुक्त आवाक् झाले. चार मजली इमारत नाल्यावर कशी बांधली ? नगररचना विभागाने अद्याप कारवाई का केली नाही? असा प्रश्‍न करत आयुक्तांनी तत्काळ संबधिताला नोटीस बजावण्याचे आदेश दिले. आठ दिवसात कारवाई करा अन्यथा तुमच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com