Breaking: औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत २९ जानेवारीला

माधव इतबारे
Friday, 22 January 2021

आता प्रशासनाने आरक्षण सोडतीची तयारी केली असून, २९ जानेवारीला सरपंच, उपसरपंच पदासाठी सोडती निघणार आहेत.

औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गावागावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. अनेकांनी मोठ्या मेहनतीने विजय मिळविला. पण सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे आरक्षण सोडत न झाल्याने निश्‍चित नव्हते. आता प्रशासनाने आरक्षण सोडतीची तयारी केली असून, २९ जानेवारीला सरपंच, उपसरपंच पदासाठी सोडती निघणार आहेत. त्यामुळे सोडतीत काय होणार, कोणते आरक्षण निघणार याविषयी इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.

जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतीचे निकाल १८ जानेवारीला जाहीर झाले. गावातील राजकारणात कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडली तर कोणाच्या नशिबी पराभव आला. विजयी झालेल्यांचे लक्ष मात्र सरपंचपद आरक्षण सोडतीकडे लागलेले आहे. त्यानुसार प्रशासनाने २९ जानेवारीला तहसीलस्तरावर आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी सांगितले, यापूर्वी आठ डिसेंबरला शासन आदेशानुसार सरपंच, उपसरपंच पदासाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.

पण ही सोडत शासन आदेशानुसार रद्द करण्यात आली. आता येत्या २९ जानेवारीला नव्याने सोडतीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यानुसार तहसीलदारांना कळविण्यात आले आहे. ही सोडती नव्याने निघणार असल्या तरी सोडतीची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबविली जाणार आहे. ग्राम पंचायत निवडणूक होण्यापूर्वी निवडणूक आयोगाने सरपंच-उपसरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचे आदेश दिले होते. ते आदेश रद्द करून निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत नव्याने सोडत घेण्याबाबत शासनाने आदेश दिला होता. त्यानुसार प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. सरपंच, उपसरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे आरक्षण सोडतीनंतर निश्‍चित होणार असल्याने इच्छुकांनी धाकधूक मात्र वाढली आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Village Sarpanch Draw On 29 January