पतंगोत्सवात झळकले ठाकरे सरकार, आपले सरकार 

मधुकर कांबळे 
बुधवार, 15 जानेवारी 2020

मकर संक्रांत आणि पतंग हे समीकरण ठरलेले आहे. कितीही मोठी माणसं असली तरी मोठेपण विसरुन पतंग उडवताना लहान होतात याचा अनुभव पतंग महोत्सवात पहायला मिळतो.

औरंगाबाद - "ठाकरे सरकार, आपले सरकार ' अक्षरे लिहलेले आणि आकाशात घिरट्या घालणारे पतंग. कधी अरे खींच तर कधी अरे ओढ ओढ, रोखलेले श्‍वास, कधी जल्लोष आणि शेवटी अरे कट गया असे आवाज ऐकायला येत होते, शिवसेनेच्यावतीने आयोजित पतंग महोत्सवात. 

हडको टी. व्ही. सेंटर मैदानावर आणि सुरेवाडी येथे शिवसेनेचा पतंग महोत्सव क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवत होता. कधी पतंगाचा दोर या नेत्याच्या हाती तर कधी त्या नेत्याच्या हातात जात होता तर काहीजण पतंगाचा दोर आपल्या हातात कधी येतो याची वाट पाहत होते.

मकर संक्रांत आणि पतंग हे समीकरण ठरलेले आहे. कितीही मोठी माणसं असली तरी मोठेपण विसरुन पतंग उडवताना लहान होतात याचा अनुभव पतंग महोत्सवात पहायला मिळतो. मकरसंक्रांतीनिमित्त शिवसेना मध्य विभागाचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांच्यावतीने गेल्या तीन वर्षांपासून हडको येथील टी. व्ही. सेंटर मैदानावर पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. 

क्‍लिक करा पुण्यासाठी लालपरी बंद

पतंगबाजीबरोबरच लहान मुलांना पतंगांचे वाटप करण्यात येते. यंदाही पतंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत पतंग महोत्सवाला सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते लहान मुलांना पतंगाचे वाटप करण्यात आले. यावेळी 3 हजार पतंग वाटण्यात आले. 

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावेळी सांगीतले, औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, पतंग महोत्सव हा त्याचाच एक भाग आहे. माध्यमांशी बोलताना आम्ही अनेकांचे राजकीय पतंग कापले आहेत असे राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने म्हटले. 

हेही वाचा : रात्रीतून जिल्हा बॅंकेची शाखा गायब!

मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचा पतंग चांगलाच आकाशात गिरक्‍या घेत असतानाच महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्यांच्या हातातुन दोर घेत पतंग उडवण्याचा आनंद घेतला. महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, यावर्षी महापालिकेने प्लास्टिच्या पतंगाला पुर्णपणे बंदी केली आहे. पतंगोत्सव हा आनंदाचा, जल्लोषाचा उत्सव असतो मात्र हा जल्लोष करताना उत्साहाच्या भरात एखादी दुर्घटना होउ नये यासाठी पतंग उडवणाऱ्यांनी भान ठेवावे. 

सुरेवाडीत युवासेनेतर्फे पतंगबाजी 

सुरेवाडी येथे युवासेनेच्यावतीने शहर समन्वयक नारायण सुरे यांनी पतंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. युवा सेनेचे सरचिटणीस अमोल किर्तीकर प्रमुख पाहूणे म्हणुन आले होते. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, महापौर नंदकुमार घोडेले, युवा सेना सचिव तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ, युवासेना जिल्हा युवाधिकारी ऋषिकेश खैरे, ऋषिकेश जैस्वाल यांची उपस्थिती होती. सर्वच नेत्यांनी पतंगबाजीचा आनंद घेतला. 

निराधार बालकांना पतंगाचे वाटप 

हनुमाननगर शिवसेना विभागातर्फे निराधारगृहातील मुलांना पतंगाचे वाटप करण्यात आले. शिवसेनेचे पूर्व विधानसभा संघटक तथा स्थायी समिती सभापती राजू वैद्य यांच्या हस्ते निराधार बालकांना व अन्य बाल गोपाळांना पतंगाचे वाटप करण्यात आले. 

हे वाचा : आघाडीत असूनही कॉंग्रेस वंचितच, राज्यमंत्री सत्तार ठरले भारी! 

 

हवा नसली की पतंग खाली येतो तसेच राजकारणातही हवा असेल तर आपला पतंग उंचीवर भराऱ्या घेत असतो. आपण दुसऱ्याचा पतंग काटतो त्यावेळी खूप मजा येते मात्र आपला पतंग कटल्यावर खूप वेदना होतात. राजकारणात जसे एखाद्याचे तिकीट कापले तर ज्या वेदना होतात त्या काय असतात हे पतंग कटल्यावर जाणवते. 

नंदकुमार घोडेले, महापौर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Shiv Sena Kite Festival