दोन आठवड्यात दीड हजार प्रवासी आढळले पॉझिटिव्ह, औरंगाबाद महापालिकेला संसर्ग रोखण्यात यश 

माधव इतबारे
Wednesday, 7 April 2021

बाधितांचा आकडा झपाट्याने वाढल्याने महापालिकेने शहरात येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित केले. शहराच्या सहा एन्ट्री पॉइंटवर पथके तैनात करून संशयित प्रवाशांच्या ॲन्टीजेन सुरू करण्यात आल्या.

औरंगाबाद : शहरात येणाऱ्या प्रवाशांपासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने सहा एन्ट्री पॉइंट्सवर ॲन्टिजेन चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून चाचण्या सुरू असून, त्यात तब्बल १४ हजार ५०० प्रवाशांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील दीड हजार प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. एका कोरोनाबाधिताकडून किमान २० जणांना बाधा होते, असा अंदाज बांधला जातो. त्यामुळे मोठा संसर्ग रोखण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे. शहरात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनासंसर्ग वाढण्यास सुरुवात झाली.

कोरोनाचा वाढता आलेख, बीड जिल्ह्यात मृत करोना रुग्णांवर सामुहिक अंत्यसंस्कार

बाधितांचा आकडा झपाट्याने वाढल्याने महापालिकेने शहरात येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष केंद्रित केले. शहराच्या सहा एन्ट्री पॉइंटवर पथके तैनात करून संशयित प्रवाशांच्या ॲन्टीजेन सुरू करण्यात आल्या. २२ मार्चपासून चाचण्या केल्या जात आहेत. स्क्रिनिंग केल्यानंतर कोणाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे असल्यास त्यांच्या अ‍ॅन्टिजेन चाचण्या केल्या जात आहेत. २२ मार्चपासून पाच एप्रिलपर्यंत तब्बल १४ हजार ५९८ प्रवाशांची अ‍ॅन्टिजेन चाचणी करण्यात आली. त्यातून १,५३५ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे मोठा संसर्ग टळला असल्याचा दावा डॉ. पाडळकर यांनी केला. 

 
विमानतळ, रेल्वेस्टेशनवरही शेकडो जण पॉझिटिव्ह 
सुरवातीला दिल्लीहून आलेल्या प्रवाशांची चाचणी करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून विमानतळ आणि रेल्वेस्टेशनवर बाहेरील शहरांतून येणाऱ्या प्रवाशांचीही महापालिकेच्या पथकांकडून नियमित कोरोना चाचणी केली जात आहे. रेल्वेस्टेशनवर दोन पथके तर विमानतळावर एक पथक कार्यरत आहेत. आत्तापर्यंत शेकडो जण याठिकाणी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Today News Above One Thousand Passengers Corona Positive In Two Weeks