दीड महिन्यात वीस कोटीच्या नियोजनाचे आव्हान

मधुकर कांबळे
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

दोन वर्षांपूर्वी मिळालेल्या रकमेचे नियोजन झाले नसल्याचे समोर आले. पुढच्या दीड महिन्यात या निधीचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

औरंगाबाद - आर्थिक वर्ष संपायला ३५ - ३६ दिवस बाकी आहेत. असे असताना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागास ५०५४ व ३०५४ अंतर्गत २५ कोटींची रक्कम अद्याप अखर्चित आहे. 

हा निधी मार्चअखेर परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकाम व अर्थ विभागातून २८ फेब्रुवारीपर्यंत २० कोटींच्या कामाचे नियोजन करुन कार्यारंभ आदेश द्यावेत, असे आदेश बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी दिले.

क्‍लिक करा : बेगमपुरा - पहाडसिंगपुरा वॉर्डाला तीर्थक्षेत्राचा दर्जा

जिल्हा परिषद बांधकाम समितीची सोमवारी (ता.२४) बैठक झाली. सदस्य कलीम कोदन, अक्षय जायभाये, शुभांगी काजे, नीता राजपूत, शिल्पा कापसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मांगुळकर उपस्थित होते.

हेही वाचा : स्टॅंप ड्युटीमुळे खेळण्याचे मार्केट संथ

 बैठकीत बांधकाम विभागाच्या निधी व कामांचा आढावा घेण्यात आला. रस्ते, पूल बांधकामासाठी असलेल्या ५०५४ लेखाशीर्षांतर्गत २१ कोटी तर ३०५४ अंतर्गत चार कोटी रुपये अखर्चित असल्याचे निदर्शनास आले. ही रक्कम जर मार्च अखेरपर्यंत खर्च झाली नाही तर निधी सरकार दरबारी परत जातो. 

दोन वर्षांपूर्वी मिळालेल्या रकमेचे नियोजन झाले नसल्याचे समोर आले. पुढच्या दीड महिन्यात या निधीचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. सभापती बलांडे यांनी बांधकाम व अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेशित केले की २८ फेब्रुवारीपर्यंत २० कोटींच्या कामांचे नियोजन झाले पाहिजे. 

ठळक बातमी : सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय होणार बंद ?  

निविदा प्रक्रियेपासून कार्यारंभ आदेशापर्यंतचे टप्पे लवकर पार पाडावेत, तांत्रिक त्रुटी काढत बसण्यापेक्षा त्या कशा सुटतील यावर भर द्यावा. फायलींचा प्रवास कमी करावा, आदी सूचना त्यांनी केल्या. केवळ नियोजन नव्हे तर त्याची अंमलबजावणी पूर्ण करुन सर्व कामांची सुरवात वेळेत झालीच पाहिजे, असे सभापती श्री. बलांडे यांनी आदेश दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Z P News Planning Of 20 Crore In One & Half Month