esakal | सत्तारांची शंभर टक्के मनधरणीत यश : पहा कोण म्हणतंय
sakal

बोलून बातमी शोधा

सत्तारांची शंभर टक्के मनधरणीत यश : पहा कोण म्हणतंय

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणीवरुन तसेच कॅबिनेट मंत्रीपदासाठी सत्तार हे नाराज असल्याचे समोर आल्यानंतर कालपासून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु होते. कॉंग्रेसच्या सदस्यांना सोबत घेऊन सत्तार यांनी जिल्हा परिषदेत पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतली होती.

सत्तारांची शंभर टक्के मनधरणीत यश : पहा कोण म्हणतंय

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : राजीनाम्याच्या नाट्यानंतर माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची औरंगाबाद शहरातील एका हॉटेल मध्ये शुक्रवारी रात्री आणि आज शनिवारी अशा तीन बैठक घेतल्यानंतर खोतकर यांना यश आले नव्हते.

आता सत्तार यांची मनधरणी करण्यात शंभर टक्के यश आले असून त्यांनी कुठलाही राजीनामा दिला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाल्यानंतर सत्तार हे रविवारी दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर जाणार असल्याची माहिती अर्जुन खोतकर यांनी यांनी दिली. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणीवरुन तसेच कॅबिनेट मंत्रीपदासाठी सत्तार हे नाराज असल्याचे समोर आल्यानंतर कालपासून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु होते.

कॉंग्रेसच्या सदस्यांना सोबत घेऊन सत्तार यांनी जिल्हा परिषदेत पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतली होती. औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपद महाविकास आघाडीला देण्यावरुन अब्दुल सत्तार हे नाराज आहे.

हेही वाचा : अब्दुल सत्तारांच्या "ना'राजीनाम्याची ही आहेत कारणे, वाचा...

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, मंत्री संदीपान भूमरे, आमदास अंबदास दानवे यांच्यात सुद्धा बंददाराआड चर्चा होऊन सुद्धा तोडगा निघाला नव्हता. अब्दुल सत्तार यांच्यासोबत खैरे यांचे खटके उडल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे.

त्यामुळे अर्जुन खोतकर यांनी सत्तार यांची भेट घेतली. भेटीनंतर खोतकर म्हणाले की, माझे सत्तार यांच्याशी बोलणे झाले. त्यांच्या राजीनाम्याच्या सर्व अफवा आहे. जिल्हा परिषदेच्या संदर्भात तसेच या सर्व घडामोडीनंतर सत्तार हे रविवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांची कुठली ही नाराजी नाही. त्यांचे संपुर्ण समाधान झाले आहे. सत्तार यांनी कुठलाही राजीनामा दिला नाही. 

लोकसभा निवडणुकीच्या वेळी दोघांमध्ये अशाच होत होत्या बैठका 

लोकसभा निवडणुकीच्या वेळी अर्जुन खोतकर यांना कॉंग्रेसमध्ये घेऊन भाजपच्या रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उभे करण्याचे प्रयत्न तत्कालीन कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि त्यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या अब्दुल सत्तार यांनी केले होते.

जालना जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात दानवे विरुद्ध खोतकर या संघर्षाचा फायदा उचलत रावसाहेब दानवे यांना चकवा देण्याची तयारी तेव्हा सत्तार यांनी केली होती. सुरुवातीला शिवसेनेत नाराज असलेल्या खोतकर यांनी देखील त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता . 

हेही वाचा : सत्तारांच्या नाराजीनाट्यानंतर जिल्हा परिषदेत काय होणार ? 

दरम्यानच्या काळात खोतकर -सत्तार यांच्या गुप्त बैठका, एकमेकांच्या भेटीगाठी याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. खोतकर गळाला लागले असे गृहीत धरून सत्तार यांनी तेव्हा जोरदार मोर्चेबांधणी केली होती.

मात्र लोकसभा निवडणूक महायुती एकत्रितपणे लढण्याचा निर्णय झाल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्जुन खोतकर यांचे बंड मोडून काढले होते . 

आज औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्तार यांनी बाहेर काढलेले राजीनामा अस्त्र त्यांना म्यान करायला लावण्यासाठी खोतकर यांवर सोपवलेली जबाबदारी सोपविली होती.