दुर्दैवी! रात्रभर मृतदेह विहीरीत तरंगत होता; सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

संतोष शिंदे
Wednesday, 3 February 2021

मंगळवारी सकाळी अकरा वाजता पूजाने मामा श्री.लकवाल यांना फोन करून नवरा, सासू, सासरा, दीर जास्तच त्रास देत असल्याचे सांगितलं होतं

पिशोर (औरंगाबाद): सासरच्या लोकांनी वेळोवेळी पैशाचा तगादा लावल्याने तसेच शारीरिक व मानसिक छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना भिलदरी (ता.कन्नड) येथे बुधवारी (ता.तीन) सकाळी सहा वाजता उघडकीस आली. पूजा नवलसिंग कायटे (वय 24) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांचे छत्र हरवलेल्या पूजाचा विवाह 2013 मध्ये भिलदरी येथील नवलसिंग कायटे याच्याशी झाला. पूजाच्या माहेरची परिस्थिती गरिबीची असल्याने मामा इंदल लकवाल यांनी स्वतःची एक एकर जमीन विकून तिचे लग्न थाटामाटात लावून दिले होते. दीड ते दोन वर्षे सासरच्या लोकांनी व्यवस्थित वागविल्यानंतर शेतात पाईपलाईन टाकण्यासाठी दोन लाख रुपयाची मागणी केली.

गावकऱ्यांच्या जंगी स्वागताने जवानाला अश्रू अनावर

परंतु माहेरी गरिबी असल्याने व मामाने पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्याने सासरच्या लोकांनी पूजाला तिच्या मामाकडे गल्ले बोरगाव येथे आणून सोडले. सासरच्या लोकांना समजावून सांगितल्यानंतर पूजाला पुन्हा सासरी पाठविण्यात आले. दीड ते दोन वर्षानंतर पती नवलसिंग व दिर अर्जुन कायटे यांनी पुन्हा पीक अप गाडी घेण्यासाठी दोन लाखाची मागणी केली. पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याने नवरा, सासू, सासरे यांनी शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. मामा श्री.लकवाल यांनी कसेबसे जमवाजमव करून चाळीस हजार रुपये दिले होते.

मंगळवारी (ता.दोन) सकाळी अकरा वाजता पूजाने मामा श्री.लकवाल यांना फोन करून नवरा, सासू, सासरा, दीर जास्तच त्रास देत असल्याचे सांगितले. दरम्यान पूजाच्या पतीने पिशोर पोलीस ठाण्यात मध्यरात्री बारा वाजता बेपत्ता असल्याची खबर दिली. बुधवारी सकाळी सहा वाजता पतीस विचारणा केली असता शेतातील विहिरीत पूजाच्या चपला तरंगत असल्याची माहिती दिली. सकाळी दहा वाजेच्या सुमारास गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.

सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा लवकरच! मतदार कार्यक्रम जाहीर

नाचनवेल येथे डॉ.संजय राजभोज यांनी दुपारी तीन वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. इंदल विठ्ठलसिंग लकवाल (वय 37, रा.गल्ले बोरगाव) यांच्या फिर्यादीवरून पती नवलसिंग कायटे, सासू शांताबाई कायटे, सासरा शंकर फुलसिंग कायटे, दिर अर्जुन कायटे (सर्व रा.भिलदरी), मावस सासू हिराबाई बारवाल, मावस सासरा रामलाल हिरालाल बारवाल (रा.गल्ले बोरगाव) आदी सहा जणांविरुद्ध विरुद्ध शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabd crime news married woman ended her life due to her father in laws troubles