औरंगाबाद शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नऊ पथकांनी ८५० घरांचे सर्वेक्षण केले. यात पाचजणांना सर्दी, ताप, खोकला असल्याचे आढळून आले.
औरंगाबाद - शहरवासीयांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे. याचा महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयावरही परिणाम झाला आहे. एरवी याठिकाणी दिवसाकाठी भेट देणाऱ्या सुमारे ४,५०० लोकांची संख्या कमी होऊन १,५०० पर्यंत आली आहे. सदैव गजबजलेल्या उद्यानात आणि प्राणिसंग्रहालयात शुकशुकाट दिसत आहे.
शहरातील सर्वांत मोठे उद्यान सिद्धार्थ गार्डन मध्यवर्ती बसस्थानकाजवळ असल्याने शहरातील लोकांसह परगावाहून या गार्डनमध्ये जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. मराठवाड्यातील एकमेव प्राणिसंग्रहालय याच ठिकाणी असल्याने जिल्ह्यासह मराठवाड्यातून अनेकजण, शाळांच्या सहली येथे येतात. सिद्धार्थ गार्डन आणि प्राणिसंग्रहालयाला एरवी भेट देणाऱ्यांची संख्या रोज सुमारे चार ते ४,५०० असते. यामध्ये बालगोपाळांची संख्या लक्षणीय असते.
क्लिक करा : कोरोनामुळे बाजारपेठेत डरोना
काही दिवसांपासून कोरोनाच्या संशयितांची संख्या वाढत जात असल्याने याचा परिणाम गार्डन व प्राणिसंग्रहालयात येणाऱ्यांच्या संख्येवर झाला आहे. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून संख्या रोडावत आहे. कोरोनाच्या परिणामामुळे आता रोज १,५०० च्या आसपास लोक भेटी देत आहेत. प्राणिसंग्रहालयाकडे जाणारेही कमी झाले आहेत.
सुट्या असूनही पाठ
गार्डनसाठी मोठ्यांना २० तर लहानांसाठी १० रुपये तर प्राणिसंग्रहालयासाठी मोठ्यांसाठी ५० तर लहानांसाठी २० रुपये प्रवेश शुल्क आहे. कोरोनामुळे सिद्धार्थ गार्डनच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. पूर्वी रोज ४० ते ४५ हजार नुसत्या गार्डनच्या प्रवेश शुल्कातून उत्पन्न व्हायचे ते आता २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत आले आहे. सुट्या असूनही लोक येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा : भावी नगरसेवक म्हणताहेत काळजी करू नका, सावध राहा
कोरोनाची खबरदारी : ८५० घरांचे सर्वेक्षण
औरंगाबाद शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नऊ पथकांनी ८५० घरांचे सर्वेक्षण केले. यात पाचजणांना सर्दी, ताप, खोकला असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. शहरातील ५९ वर्षीय महिलेच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. तिच्या स्वॅब तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. औरंगाबादेतील हा पहिलाच कोरोनाबाधित रुग्ण आहे. ही माहिती समोर येताच शहरात सर्वत्र ॲलर्ट जारी करण्यात आला.
शहरातील कोरोनाबाधित महिला रुग्णाचे सर्व निकटवर्तीय व नातेवाइकांशी संपर्क साधून प्राथमिक चौकशी व तपासणी करण्यात आली; मात्र त्यातील कोणालाही कोरोना आजाराबाबतची लक्षणे आढळून आलेली नाहीत. ८५० घरांच्या सर्वेक्षणात पाचजणांना सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे आढळून आली. ते सर्वजण खासगी डॉक्टरांकडून उपचार घेत असून, त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
ठळक बातमी : औरंगाबाद जिल्ह्यात संभाव्य टंचाईग्रस्त गावांची संख्या सहाशेवर