अंगणात आला म्हणून दिव्यांग बाळाला फावड्याने मारले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जानेवारी 2020

मुलाच्या डोक्‍यातून, नाकातून रक्तस्राव होत होता व दोन दातदेखील पडले होते. त्यामुळे दीपकने मुलाला तातडीने पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात व तिथून घाटीत दाखल केले.

औरंगाबाद : अंगणात आला म्हणून पाच वर्षांच्या बालकाला फावड्याने तोंडावर, डोक्‍यात तसेच कानावर मारहाण करून रक्तबंबाळ करणाऱ्या आरोपीला दोन वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सहजिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी ठोठावली. 

विष्णू विठ्ठल गायकवाड असे त्या आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर केवळ 11 महिन्यांत शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 

याप्रकरणी पीडित मुलाचे वडील दीपक दशरथ चांदणे (38, रा. पाचोड, ता. पैठण) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, फिर्यादी व शिक्षा ठोठावण्यात आलेला विष्णू विठ्ठल गायकवाड (33) हे एकाच गल्लीत राहतात. पाच फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी दीपक यांच्या पाच वर्षांच्या जन्मजात मुक्‍या मुलाला अंगणात आला, म्हणून विष्णूने फावड्याने बेदम मारहाण केली. 

यात मुलाच्या डोक्‍यातून, नाकातून रक्तस्राव होत होता व दोन दातदेखील पडले होते. त्यामुळे दीपकने मुलाला तातडीने पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात व तिथून घाटीत दाखल केले.

हेही वाचा- VIDEO : थर्टी फर्स्ट बेतला जिवावर, कार विहिरीत कोसळली, दोन ठार, तीन गंभीर

प्रकरणात तक्रारीवरून पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खटल्यावेळी, सहायक सरकारी वकील उल्हास पवार यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यामध्ये डॉक्‍टर व दीपकची साक्ष महत्त्वाची ठरली. 

दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने विष्णूला दोषी ठरवून भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये दोन वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. ऍड. पवार यांना ऍड. अविनाश कोकाटे यांनी साहाय्य केले.

हे वाचलंत का?Video : दोन किलो मिठाई खाणारा उंदीर... पहा पराक्रम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brutally Beated Child in Paithan Aurangabad News