दुसऱ्यांपुढे हात पसरण्यात हरवतेय बालपण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद- रस्त्यावरचे गर्दीचे ठिकाण असो, वाहतूक सिग्नल असो अथवा धार्मिक वा सार्वजनिक ठिकाण, तेथे मळकट, फाटक्‍या कपड्यांतील केविलवाणे चेहरे असलेली मुले भीक मागताना हमखास दिसतात. दिवस निघताच घरातून बाहेर पडायचे आणि संध्याकाळी मुक्‍कामाच्या ठरलेल्या ठिकाणी परतायचे. त्यांना ना शाळा माहीत ना खेळणे-बागडणे. पोट भरण्याची जबाबदारी असल्यामुळे बालपण काय असते हे त्यांनाच माहिती नसल्याचे काही बालकांशी बोलल्यावर लक्षात येते. 
हाताला काम नाही, गावात रोजगार मिळत नसल्याने अनेक कुटुंबे शहरांकडे पोट भरण्यासाठी धाव घेतात. त्यामध्ये परराज्यांतून येणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. शहरात आल्यानंतरही काम मिळेल याची शाश्‍वती नाही, तर काहींनी भीक मागण्यालाच आपल्या उपजीविकेचे साधन बनविल्याने शहराच्या अनेक भागांत भीक मागणाऱ्यांची संख्या दिसत आहे. शहरातील कॅनॉट परिसर, चिकलठाणा, सेव्हनहिल परिसर, औरंगपुरा, पैठणगेट, आकाशवाणी चौक, बाबा पेट्रोलपंप चौक, रेल्वेस्टेशन, बसस्थानक तसेच विविध मंदिरांच्या परिसरात अशी संख्या वाढत आहे. 

भीक नव्हे, लाखोंचा व्यवसाय 
सर्वसामान्य व्यक्तीपुढे हात पसरवलेल्या महिला तसेच लहान मुलांकडे बघून त्यांच्या आयुष्याचा, भविष्याचा विचार करून त्यांना पैसे दिले जातात; परंतु यातील अनेकजण हे टोळीने पैसे मागतात. भीक मागण्यासाठीदेखील एरिया ठरवून देण्यात आलेले असावेत अशा पद्धतीने ते भीक मागत असतात. प्रत्येक टोळीत लहान मुलांच्या बरोबरीने एक महिला किंवा पुरुष असतात. एकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की या सर्वांचा एक प्रमुख आहे. जो दररोज रात्री सर्वांचा हिशेब घेत असतो. जमा झालेल्या भिकेतून निम्मे पैसे भीक मागणाऱ्याला तर निम्मे पैसे तो घेतो. यातून दिवसाला हजारो तर महिन्याला लाखोंची उलाढाल होते. विषेश म्हणजे एक दुसऱ्यांच्या एरियात जाऊन पैसे मागता येत नाहीत. 

गुन्हेगारी विश्‍व 
भीक मागणाऱ्या बालकांना कुठलाच धाक नसल्यामुळे यातील अनेकजण कमी वयातच वेगवेगळ्या नशेच्या आहारी जातात. यामुळे पुढे चोऱ्या, लुटमार, जुगार करण्याचेही प्रकार वाढले आहेत. भीक मागणारी सर्वच मुले त्यांचीच असतात असे नाही. या महिलांसोबत असलेली लहान मुले त्यांची नसल्याचेही अनेक प्रकार घडलेले आहेत. या महिलादेखील रात्री मद्यपान करून आपसात भांडणे करतात. यामुळे पादचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतो; तसेच निवारा नसल्यामुळे स्वच्छ राहत नाहीत. अनेकांना त्वचारोग, साथीचे रोग, श्‍वसनाचे आजार जडलेले आहेत, असे चाइल्ड हेल्पलाइन संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले. 

उपाययोजना काय? 
शहरातील भीक मागणाऱ्या महिला, पुरुष व लहान मुलांवर दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे. 18 ते 60 वर्ष वयोगटातील काम करू शकणाऱ्यांची मानसिकता बदलावी; तसेच 1 ते 18 वयोगटातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करावेत. त्यांना बालसुधारगृहात प्रवेश देऊन त्यांच्यासाठी शिक्षणाची दरवाजे उघडी करावीत; तसेच महिलांसाठी कमी भांडवलाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन प्रोत्साहन द्यावे. त्याचप्रमाणे 60 वर्ष वयोगटोतील वृद्धांसाठी आश्रमात प्रवेश द्यावा. 

काही दिवसांपासून आम्ही सिग्नलजवळ भीक मागणारी लहान मुले व महिलांसाठी काम करीत आहोत. तीन महिन्यांत आम्ही या सर्वच महिला, मुलांच्या समस्या जाणून घेतल्या. यावर तोडगा काढण्यासाठी शहरातील 78 महिलांना कायदेविषयक सल्ला व समज दिली आहे; तसेच मुलांना सांभाळता येत नसेल तर शहरातील बालसुधारगृहात टाकावे. यासाठी सुधारगृहाच्या प्रक्रियेची माहितीही दिली आहे. यानंतरही जे भीक मागत असतील त्यांना आम्ही बालसंरक्षण पथकाला सोबत घेऊन रेस्क्‍यू करून बालकल्याण समितीकडे उभे करणार असून त्यापुढील कार्यवाई ही समिती करेल. 
आप्पासाहेब उगले, संचालक, चाइल्ड हेल्पलाइन  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com