सिडको बसस्थानक नव्हे हे तर अपघाताचे 'हॉटस्पॉट'... बसच्या धडकेत दिव्यांग गंभीर

सुषेन जाधव
Saturday, 30 January 2021

सिडको स्थानकात शुक्रवारी रात्री १० वाजता ही घटना घडली आहे. एसटी बसचालकाने एकास ठोकरले आणि तिथून चालक पसार झाला आहे.
 

औरंगाबाद: मुख्य रस्त्यावरून वळण घेऊन सिडको बसस्थानकात भरधाव वेगात आलेल्या बसची एका दिव्यांग मुलास धडक बसली. यात संबंधित मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (ता.२९) रात्री दहाच्या सुमारास घडली. निखिल चव्हाण (वय १६, रा. रांजणगाव शेणपुंजी, ता. गंगापूर) असे जखमीचे नाव आहे.

बसस्थानकात प्रवेश करताना बस इतक्या वेगात होती की, निखिलला नेमके पळावे कुठे हेही समजले नाही. त्यात आधीच तो पायाने दिव्यांग आहे. बसच्या मधोमध येत पुढच्या टायरला घासून तो मागच्या टायरला घासत गेला. टायरने घासत नेल्याने दैव बलवत्तर म्हणून तो वाचला; अन्यथा त्याला घासत नेणारे टायरच त्याच्या अंगावरून गेले असते तर अनर्थ घडला असता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

वक्फ बोर्डाच्या जागेवर शंभर कोटींचा घोटाळा - खा. इम्तियाज जलील

याबाबत जखमी निखिलचा मामा नवनाथ गिरी दिलेल्या माहितीनुसार निखिल हा रांजणगावहून सिडकोत राहणाऱ्या मामाच्या घरी आला होता. तिथून तो पुन्हा रांजणगावला जाण्यासाठी सिडको बसस्थानकावर आला. शहर बसने तो रांजणगावला जाणार होता. त्यासाठी तो बसस्थानकावर थांबला असता त्याला भरधाव वेगात आलेल्या पुणे-जालना बस (एमएच ०९, एफएल ००७५) या स्लिपर बसने धडक दिली. आधीच दिव्यांग असल्याने त्याला हालचाल करता आली नाही.

या धडकेत निखिलच्या हाता-पायाला जबर मार लागला. घटनेनंतर बसचालक फरार झाला. जखमीला सुरवातीला प्रवासी, पोलिसांनी एका खासगी दवाखान्यात हलविले. मात्र, काही वेळानंतर त्याला घाटी रुग्णालयात दाखल केल्याचे गिरी यांनी सांगितले. प्रवाशांनी तात्काळ रुग्णवाहिकेला संपर्क केला मात्र अर्ध्या तासाने गाडी येईल असे सांगत उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. घटनेनंतर पाऊण तासानंतरही रुग्णवाहिका न आल्याने अखेर जखमीला पंकज शेजूळ या रिक्षाचालकाने आणि एमआयडीसी सिडकोचे पोलिस विक्की इंगळे, होमगार्ड अमोल जाधव यांनी दवाखान्यात नेले. दरम्यान सिडको आगाराचे श्री. पठाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत जखमी निखिलची विचारपूस केली.

औरंगाबाद जिल्ह्यात मध्यरात्री शेतकऱ्याच्या अडीचशे कोंबड्या मृत

आईवरच कुटुंबाची भिस्त-
जखमी निखिलचे वडील कर्करोगाने त्रस्त आहेत. त्यांना गळ्याचा कर्करोग झाल्याने बोलताही येत नाही. आई एका कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविते. चव्हाण कुटुंबीय मूळचे जालना जिल्ह्यातील रहिवासी असून, दहा वर्षांपासून रांजणगावला राहत असल्याचे निखिलचे मामा नवनाथ गिरी यांनी सांगितले.

(edited by- pramod sarawale)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cidko bus stand accident news Divyang seriously injured in bus collision