महाविद्यालयेच बंद केल्याने उतरली अभियांत्रिकीची सुज - डॉ. अभय वाघ

GECA Aurangabad News
GECA Aurangabad News

औरंगाबाद : पुर्ण क्षमतेने चालू नसलेली तब्बल तीस महाविद्यालयेच गेल्या दोन वर्षात बंद केल्याने अभियांत्रिकी महाविद्यालयांची सुज उतरल्याचे तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी स्पष्ट केले. एनबीए मानांकनासाठी राज्यातील शासकीय, अनुदानीत महाविद्यालयांची 100 टक्‍के पदे भरण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवात गुरुवारी (ता. 23) प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

महाविद्यालयाच्या प्रांगणात महोत्सव होत आहे. तत्पुर्वी आजी माजी विद्यार्थ्यांच्या एक्‍स्पोचे उद्‌घाटन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याहस्ते झाले.

हेही वाचा - 

डॉ. वाघ म्हणाले, अभियांत्रिकी महाविद्यालये चारशेच्या घरात गेल्याने दर्जा घसरला. काहींनी तर महाविद्यालयात सेकंड शिफ्ट सुरु केली होती. यात अभियंते भरमसाठ वाढले. त्यामुळेच राज्यात एकाही नव्या महाविद्यालयास परवानगी देण्यात येऊ नये, सेकंड शिफ्ट रद्द करावी, अशी विनंती एआयसीटीईला केली. परिणामी मागणी आणि पुरवठ्यातील तफावत कमी झाली. त्यानंतर सुस्थितीत नसलेल्या महाविद्यालयाच्या संस्थाचालकांना बोलावून ती बंद करण्याचा सल्ला दिला. यात 30 महाविद्यालये बंद झाल्याने राज्याचा आराखडा आटोक्‍यात आला.

हुकाला उत्तर इनोव्हेशनच
सध्या जग हुका सिस्टीमला (असुरक्षितता, अनिश्‍चितता, क्‍लिष्टता, अस्पष्टता) सामोरे जात आहे. याला केवळ इनोव्हेशननेच उत्तर देता येईल. आपण जोपर्यंत तंत्रज्ञानात चांगले काम करत नाही, तोपर्यंत इंडस्ट्रीत यश मिळवू शकत नाही. श्री. भोगले यांनी चौकटीबाहेर जाण्याचा सल्ला दिला. श्री. भोसले, डॉ. मुरनाळ यांनी प्रगतीचा आढावा घेतला. उद्‌घाटनानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पुरुषोत्तम करंडक विजेती म्यॉट्रिक ही एकांकिका सादर झाली.

13 महाविद्यालयांची पदे भरणार
राज्यात 9 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये आणि 4 अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. त्यामधील 100 टक्‍के पदे भरण्यात येणार आहेत. राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळेच येत्या पाच महिन्यात औरंगाबादच्या पाच शाखांना एनबीए मानांकन मिळायला हवे. अशी अपेक्षा डॉ. वाघ यांनी व्यक्‍त केली.

प्राध्यापकांनाही इनप्लांट ट्रेनिंग
डॉ. वाघ म्हणाले, विद्यार्थ्यांना जसे इनप्लांट ट्रेनिंग आवश्‍यक केले तसेच अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांनाही यापुढच्या काळात सक्‍तीचे केले जाईल. तो काळ फार लांब नाही, याची लवकरच अंमलबजावणी होईल. प्राध्यापक उद्योगात गेले तर तेही अपग्रेड होतील. सातवा वेतन आयोगाला लागू करताना या गोष्टी पाहिल्या जातील.

महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्ष विवेक भोसले, प्राचार्य डॉ. प्राणेश मुरनाळ, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अजीत सौंदलगीकर, उद्योजक राम भोगले, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com