esakal | फिर्यादीच निघाला आरोपी! लाखो रुपयांच्या सिगारेटसह माल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

Kannad Police

चालकाने फिर्याद दिली त्यानेच वडिलांसह, साथीदाराच्या मदतीने लाखो रुपयांचा माल दुसऱ्या वाहनात टाकून लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला.

फिर्यादीच निघाला आरोपी! लाखो रुपयांच्या सिगारेटसह माल जप्त

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : पुणे येथील कंपनीतून जळगावला नेण्यात येणारा सिगारेट बॉक्स व अन्य माल कन्नडनजीक वाहनातून चोरी झाला. मग चालकाने पोलिसात फिर्यादही दिली. पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठला, तेव्हा ज्या चालकाने फिर्याद दिली त्यानेच वडिलांसह, साथीदाराच्या मदतीने लाखो रुपयांचा माल दुसऱ्या वाहनात टाकून लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला.

भाज्यापाल्यांनी खाल्ला ‘भाव’; सर्वसामान्यांच्या खिशाला झळ, आवक घटल्याचा परिणाम

चालकासह या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. ही कारवाई शनिवारी (ता. तीन) करण्यात आली. पुणे येथील आयटीसी कंपनीतून लाखो रुपयांची सिगारेट, बिस्कीट व सॅनिटायझर घेऊन पवन भागवत पाटील (वय ३०, रा. बोकखेडा, ता. चाळीसगाव) हा जळगावला निघाला होता. झोप आल्याने त्याने कन्नडनजीक टोलनाक्यावर वाहन बाजूला लावून झोप घेतली; मात्र पहाटे उठल्यानंतर वाहनात माल कुणीतरी पळवला अशी तक्रार कन्नड पोलिस ठाण्यात दिली.

त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. तांत्रिक तपासानंतर फिर्यादी पवन पाटील याच्यावर संशय बळावला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यानेच वडील भागवत एकनाथ पाटील व साथीदाराच्या मदतीने माल लंपास केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांना राजेंद्र तुकाराम शेळके (रा. लोहारा, ता. पाचोरा), शेख तौफिक शेख रफिक (२८, रा. फुलेनगर, माजलगाव), अलीम अतार अहेमद (२५, रा. अशोकनगर, माजलगाव), वसीम मजीद बागवान (रा. फुलेनगर, माजलगाव), प्रतीक दिलीपकुमार ललवाणी (रा. माजलगाव) यांचा सहभाग आढळून आला.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे वाढते प्रमाण दिलासादायक

यापैकी प्रतीक पसार झाला आहे. हा माल अंबड (जि. जालना) येथील राजेंद्र दीपक मंत्री यांना विकल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी व्यापारी मंत्रीलाही मालासह ताब्यात घेतले. पोलिसांनी एकूण १७ बॉक्स सिगारेटचा २४ लाख ९० हजारांचा माल जप्त केला. तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन व इतर साहित्य जप्त केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, संदीप सोळंके, संजय काळे, विक्रम देशमुख, विठ्ठल राख, राजेंद्र जोशी आदींनी केली.