esakal | HIV प्रमाणे कोरोनाचाही होतो आरोग्यावर दूरगामी परिणाम?
sakal

बोलून बातमी शोधा

Interview with Dr. Anil Kawarkhe About Corona

कोरोना विषाणूबाबत अजूनही सर्व सामान्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, एचआयव्हीप्रमाणे कोविड-१९ चे आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात का? डास चावल्याने कोरोना होतो का? सॅनिटायझर प्यायल्याने तो बरा होईल का? तापमानाचा या विषाणूवर काय परिणाम होतो, असे एक ना अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची वाशीम येथील प्रसिद्ध डॉक्टर अनिल कावरखे यांनी दिलेली उत्तरे. 

HIV प्रमाणे कोरोनाचाही होतो आरोग्यावर दूरगामी परिणाम?

sakal_logo
By
विकास देशमुख

औरंगाबाद : कोरोना विषाणू आणि त्यापासून होणाऱ्या कोविड-१९ आजारामुळे सगळे जग त्रस्त झालेले आहे. या आजाराची चांगली बाब म्हणजे यातून बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे; पण जे रुग्ण कोरोनामुक्त झाले त्यांना पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते का, होते तर त्यामागची कारणे काय आहेत, या प्रश्नांसह सर्वसामान्यांना पडणाऱ्या इतर काही प्रश्नांची डॉ. अनिल कावरखे यांनी खास eSakal.com च्या वाचकांसाठी दिलेली उत्तरे. 

प्रश्न :  कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना लगेच बाधा होऊ शकते का? 

उत्तर :  हो! कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांनाही लगेच कोरोनाची बाधा होऊ शकते. गेल्याच आठवड्यात उत्तरप्रदेशमधील गौतम बुद्धनगर जिल्ह्यातील कोविड-१९ च्या दोन रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते; पण नंतर केलेल्या चाचणीत त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यांच्यावर आता ग्रेटर नोएडाच्या ‘जिम्स’ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हे आपल्याकडेच घडले असे नाही; तर चीनसह काही देशांतही अशी प्रकरणे समोर आली आहेत. ते नेमके पुन्हा कसे बाधित झाले, याचे संशोधन सुरू आहे. बाधित व्यक्ती बरी झाल्यानंतर तिला पुन्हा   कोरोनाचा संसर्ग होतो, हे ता.चार एप्रिलला डब्ल्यूएचओनेही सांगितले. 

प्रश्न : बाधित बरा झाला हे कसे ठरविले जाते? 

उत्तर : एखाद्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे त्याच्या स्वॅबचे नमुने परत घेतले जातात. त्यानंतर १४ व्या दिवशी २४ तासांच्या फरकाने बाधिताच्या लाळेचे दोन वेळा नमुने घेतले जातात. हे दोन्ही नमुने निगेटिव्ह आले तरच रुग्ण बरा झाला हे निश्चित केले जाते. 

हे वाचले का?  कोरोना बरा होतो; मग एड्सपेक्षा धोकादायक का?

प्रश्न : कोरोनातून मुक्त झालेल्या व्यक्तीला घरी सोडल्यानंतर काय? 

उत्तर - रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्याला घरी सोडले गेले तरी अशा व्यक्तीला घरातच काही दिवस अलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जातो. योग्य त्या सूचना केल्या जातात. त्यानंतर आवश्यकता पडल्यास तिच्यासह तिच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या स्वॅबचे नमुने घेऊन तपासणी केले जाते. 

प्रश्न : एचआयव्हीप्रमाणे कोविड-१९ चे आरोग्यावर दूरगामी परिणाम होतात का? 

उत्तर : याबाबत सध्या संशोधन सुरू आहे. आताच स्पष्ट ते काय सांगता येणार नाही; कारण सध्या अभ्यास करणाऱ्यासाठी आपल्याकडे एकही उदाहरण नाही. कोरोनातून मुक्त झालेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होतो की नाही, हे एक ते दीड वर्षानंतरच स्पष्ट होणार आहे. 

प्रश्न : बाधित आणि सुदृढ व्यक्तीला एकाच डासाने चावा घेतला तर? 

उत्तर : तसे झाले तर कोविड-१९ होत नाही! सध्या असे कुठलेच उदाहरण नाही. बाधित व्यक्तीच्या तोंडातून उडणाऱ्या तुषाराच्या संपर्कात जर निरोगी व्यक्ती आली तरच तिला कोरोनाची बाधा होऊ शकते. हेही डब्ल्यूएचओने आपल्या संकेतस्थळावर स्पष्ट केलेले आहे. 

प्रेरणावाट : स्वतः कोरोनाग्रस्त, तरीही जपला डॉक्टरी धर्म

प्रश्न : सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असते. त्यामुळे कोरोना विषाणू नष्ट होतो तर थेट अल्कोहोल प्यायल्याने कोरोना नष्ट होतो का? 

उत्तर : नाही! दारू, अल्कोहोल प्यायल्याने शरीरातील कोरोना नष्ट होत नाही. असा प्रयोग कुणीही करू नये. इराणमध्ये काही बाधित व्यक्तींनी कुणाच्या तरी सांगण्यावरून दारू प्यायली. अशा २७ जणांचा मृत्यू झाला. 

प्रश्न : सॅनिटायझर पोटात गेले तर? 

उत्तर : तसे झाल्यास त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होईल. सॅनिटायझर एक केमिकल आहे. त्यात असे काही घटक आहे की जे डोळे, तोंड किंवा नाकात गेले तर आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. सॅनिटायझर शरीरावर चिकटलेले विषाणू नष्ट करते शरीरातील नाही, हे लक्षात घ्या! ते पोटात गेले तर अपायकारकच ठरेल. 

काय सांगता : भयंकर! कुत्रा, मांजर, चिमणीलाही कोरोना, आता मनुष्याचे काय? 

प्रश्न : तापमान ४२-४५ अंशांपर्यंत गेले तर कोरोनाचे विषाणू नष्ट होतात का? 

उत्तर  :  नाही! तापमानाचा आणि कोरोनाच्या विषाणूचा काहीही एक संबंध नाही हेसुद्धा डब्ल्यूएचओने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर स्पष्ट केले आहे. उष्ण हवामान असलेल्या देशांमध्येसुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तापमान वाढले तर कोरोना नष्ट होईल, या भ्रमात कुणी राहू नये. आपल्याकडे अकोल्यात आताच ४० अंशांच्या पुढे तापमान गेले आहे. तिथेही कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

प्रश्न : कोरोनावर उपाय काय? 

उत्तर : सध्यातरी सोशल डिस्टन्स, आपणच आपली काळजी घेणे, घराबाहेर न पडणे आणि सरकार सांगत असलेल्या सूचनांचे पालन करणे हाच एकमेव उपाय आहे. फारच अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा. उगाच रुग्णालयात जाऊ नका. तिथे गर्दी करू नका. डॉक्टर कायम तुमच्या सोबत आहेत. फोनवर ते नेहमीच उपलब्ध असतील. कोरोनाशी संबंधित लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. घाबरू नका. बाहेरून आल्यास कपडे बाहेरच एक दिवस उन्हात ठेवा. स्वच्छ अंघोळ करा. वारंवार हात धुवा. मित्रांचा, आप्तेष्टांचा प्रत्यक्ष संपर्क टाळा.