धक्कादायक! घाटी रुग्णालयातील ब्रदर कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

कोरोनाबाधित ब्रदर तीन दिवसांपासून सर्दी-पडशाने त्रस्त होता. तीनही दिवस त्याने घाटीत ड्युटीदेखील केली. त्यामुळे लक्षणे दिसून आल्यानंतर खबरदारी म्हणून त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. तो अहवाल पॉझिटिव्ह आला.

औरंगाबाद : औरंगाबादच्या शासकीय रुग्णालय-घाटीमधील अपघात विभागात काम करणाऱ्या ३८ वर्षीय परिचारकाला (ब्रदर) कोरोनाची लागण झाली आहे. काल रात्री त्याचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्याला उपचारासाठी तातडीने चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. 

घाटीच्या अपघात विभागात काम करणाऱ्या या ब्रदरला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच त्याच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या पत्नीची आणि आणखी एका ब्रदरची स्वॅबची टेस्ट केली जाणार आहे. त्याचबरोबर आणखी तीन डॉक्टरांनाही निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. 

कोरोनाबाधित ब्रदर तीन दिवसांपासून सर्दी-पडशाने त्रस्त होता. तीनही दिवस त्याने घाटीत ड्युटीदेखील केली. त्यामुळे लक्षणे दिसून आल्यानंतर खबरदारी म्हणून त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. तो अहवाल पॉझिटिव्ह आला.

आता झाले ११ रुग्ण

शहरातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे. रविवारी एकाच दिवशी ७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खडबडून जागे झाले आहे. या रुग्णांमध्ये एन-४ मध्ये ३, सातारा परिसर १, देवळाई १, जलाल कॉलनी २, आरिफ कॉलनी १ आणि रोशन गेट १ अशा रुग्णांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यातील एकाचा मृत्यूसुद्धा झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CoronaVirus Covid-19 Patient Positive In Aurangabad GMCH Ghati Hospital Maharashtra