Crime News: मुलीकडे एकटक बघणाऱ्यास ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 February 2021

भादंवि कलम ३५४ (ड) खाली सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजारांचा दंड व दंड न भरल्यास १५ दिवस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली

औरंगाबाद: तेरा वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिच्याकडे वाईट नजरेने एकटक बघणाऱ्या ३७ वर्षीय व्यक्तीला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी शुक्रवारी (ता. ५) सुनावली. दामोदर कन्हैय्या राबडा (रा. एन-७, सिडको) असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही ४ मे २०१७ रोजी व्यंकटेशनगर येथील घरातून समोरील उद्यानात सायकल खेळण्यासाठी गेली होती. मागील २०-२५ दिवसांपासून पाठलाग करणारा दामोदर हा फिर्यादीकडे बाहेर उभा राहून वाईट नजरेने एकटक पाहात होता. शालेय साहित्य आणण्यासाठी फिर्यादी जात असतानाही तो पाठलाग करायचा. एके दिवशी मामाच्या घरी जात असतानाही आरोपी मागे आला व बाहेर उभा राहून एकटक पाहात होता. त्याबाबतची माहिती तिने मामाला दिली.

सावधान! डी - मार्टच्या फेक लिंकवर क्लिक कराल तर होऊ शकतं नुकसान

मामाने व इतरांनी मिळून आरोपीला पकडून जिन्सी पोलीस ठाण्यात नेले. तेथे तक्रारीवरून दामोदरविरुद्ध भादंवि कलम ३५४ व पोक्सो कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी विशेष सरकारी वकील ज्ञानेश्वरी नागूल यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्याआधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. यामध्ये फिर्यादीची व घटनेतील प्रत्यक्षदर्शींची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने दामोदर राबडा याला भादंवि कलम ३५४ (ड) खाली सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व दहा हजारांचा दंड व दंड न भरल्यास १५ दिवस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime News person who looks girl alone is sentenced 6 months jail