दुधाळ जनावरांचा निधीही कोरोनाने खाल्ला!

मधुकर कांबळे
Wednesday, 15 July 2020

कोरोनामुळे यावर्षी विविध विकासकामांना फटका बसला आहे. यातील एक म्हणजे दुधाळ जनावरे वाटपाची योजना. या योजनेत गरिबांना दूध-दुभत्यासाठी जनावरांचे वाटप केले जाते. यंदा कोरोनामुळे निधी तर कमी झालाच शिवाय योजनेचा लाभ मिळण्यासाठीही वाट पाहावी लागणार आहे. 

औरंगाबाद -  शेतीला दुग्धोत्पादनाची जोड मिळावी म्हणून जिल्हा परिषदेकडून विशेष घटक योजनेतून दुधाळ गायी, म्हशींचे वाटप केले जाते. गेल्या वर्षातील लाभार्थ्यांची निवड होऊन तालुक्यांना निधीही पोचला मात्र कोरोनामुळे जनावरांचे बाजारच बंद असल्याने निवड झालेल्या लाभार्थ्यांना दूध-दुभत्यासाठी बाजार सुरू होण्याची वाट पाहावी लागणार आहे. तर चालू आर्थिक वर्षात कोरोनामुळे या योजनेसाठी केवळ ३३ टक्केच निधी उपलब्ध झाल्याने यंदा कमी लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. 

हेही वाचा- सोयाबीन उगवलेच नाही, तक्रारी ४९ हजार अन् गुन्हे केवळ ४६! खंडपीठात झाली सुनावणी 

अशी आहे योजना 
विशेष घटक योजनेतून ७५ टक्के अनुदानावर पशुसंवर्धन विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील गरजूंना दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येते. यामध्ये दोन गायी किंवा म्हशी दिल्या जातात. या योजनेमुळे गरजूंना मोठा आर्थिक आधार मिळतो. यातून महिलांचे सक्षमीकरण होण्यासही मदत होत आहे. त्यामुळे ही योजना महत्त्वाची आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आणि पंचायत समित्यांकडे निधीही वर्ग करण्यात आला; परंतु कोरोना महामारीमुळे जनावरांचे बाजार भरवण्यावर आलेल्या निर्बंधामुळे दुधाळ जनावरांची खरेदी होऊ शकली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. परिणामी लाभार्थ्यांना आता वाटच पाहावी लागणार आहे. 

हेही वाचा- शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत

लाभार्थी होणार कमी 
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून २०२०-२१ या वर्षाचे लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ३० जुलैपर्यंत पंचायत समितीस्तरावर अर्ज मागवण्यात आले आहेत; मात्र कोरोना महामारीमुळे चार मे २०२० रोजी शासनाने ३३ टक्क्यांच्या आधीन राहूनच निधी योजना राबवण्याचे निर्देश दिलेले आहेत. यामुळे यंदा केवळ ३३ टक्केच निधी या योजनेसाठी लाभ मिळणार आहे. परिणामी लाभार्थीसंख्या यावर्षी कमी होणार आहे. प्रति लाभार्थी दोन दुधाळ जनावरे आणि त्यांचा तीन वर्षांसाठीचा विमा असा ८५ हजार ६१ रुपयांचा खर्च केला जाणार असून, ३९ लाभार्थ्यांची निवड केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. कोरोनामुळे यंदा विविध विकासकामांना फटका बसलेला आहे. यातील ही एक योजना आहे. 
संपादन ः प्रवीण मुके


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Difficulties in milch cattle distribution scheme this year