कोरोना झाला? घाबरू नका!

मनोज साखरे
Monday, 21 September 2020

कोरोनाच्या दररोज बातम्या ऐकायला मिळतात. एवढी संख्या वाढली, एवढ्यांचा मृत्यू झाला. मात्र कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. फक्त काळजी घेणे आपल्या हातात आहे.

औरंगाबाद : ‘आपण कोरोना पॉझिटिव्ह आहात’ असा संदेश अथवा कॉल आल्यानंतर अनेकांना घाम फुटतो. बहुदा अँटीजेन टेस्ट केल्यानंतर लगेच नकारात्मक विचार मनात येतात. जरी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली तरी घाबरू नका. सकारात्मकता ठेवा ! हीच सकारात्मकता व धैर्य कायम ठेवल्यास आपण लवकर बरे होऊन घरी परतू शकतो, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.

औरंगाबादेत २७७ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात २३ हजार ९८५ रुग्ण झाले बरे

कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर बाधित व्यक्तीसह त्याचे कुटुंबीय काही काळ तणावात असतात. काय होणार, कसे होईल, उपचार काय असतील, असे अनेक प्रश्‍न पडू शकतात. भीतीही वाटू शकते. मनाची समजूत घाला; पण बाऊ करू नका. या काळात मनात वाईट, नकारात्मक विचार येऊ शकतात.

लक्षणे नसलेले, थोडीफार लक्षणे असलेले व त्रास जाणवत असलेल्या मॉडरेट रुग्णांनी उपचार घेताना मी बरा होणारच व लवकर घरी जाणार, असा मनाशी पक्का निश्‍चय करायला हवा. त्यादृष्टीने प्रयत्नही करायला हवेत. दुसरी बाब म्हणजे इतर रुग्णांच्या प्रकृतीवरून व अनुभवावरून आपले अंदाज बांधायला नकोत. स्वतःचे मूल्यांकन करू नका. ते डॉक्टरांना करूद्या. या गोष्टींबाबत जागरूक राहिल्यास व कृती केल्यास लवकर बरे व्हाल.

या गोष्टींचा करा अवलंब
- आपण पॉझिटिव्ह आला असाल तर घाबरून जाऊ नका.
- शांत राहा. मनात नकारात्मक विचार आणू नका.
- पॉझिटिव्ह कसा झालो या विचारापेक्षा आता काय उपाय करायचे, याकडे लक्ष द्या.
- सुरवातीचे दोन दिवस मानसिक दबाव असतो; पण नंतरचे आपले आठ दिवस चांगले जाऊ शकतात.
- त्यासाठीच मन सकारात्मक ठेवा.
- तुम्ही घेतला तर ताण, न घेतल्यास धीर हे लक्षात असू द्या.

शाळा विकणे आहे, खरेदीदार मिळेल का? कोरोनाचा शिक्षण क्षेत्राला मोठा फटका

याकडे नको दुर्लक्ष
- डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष नको.
- वेळेवर औषधी, आहार व झोप घ्या.
- या काळातील नेहमीची दिनचर्या ठरवा व अवलंब करा.
- स्वच्छतेच्या बाबतीत दिरंगाई नको, वेळेचे नियोजन करा.
- मन रमविण्यासाठी माहिती, मनोरंजनाचा उपयोग घ्या.
- चर्चाही करा, फोनवरून हितगुजही साधा; पण शरीरावर ताण पडणार नाही याची काळजी घ्या.

 

कोरोनामुळे लोक घाबरलेले आहेत. चिंता वाढली. अस्वस्थता, व्यसनाधीनता वाढली, असे दिसून येते. दोन-तीन प्रकारचे लोक दिसतात. संयमाने कोरोनाचा सामना करणारे, दुसऱ्या प्रकारातील लोक परिस्थितीचे क्षुल्लकीकरण करतात. कोरोना काही नसतो. मला काही होत नाही हे महाभयंकरीकरण अर्थात राईचा पर्वत करणारे तिसऱ्या प्रकारात मोडतात. अतिकाळजी करणारेही आहेत. त्यातून बेचैनी, अस्वस्थतेत जगताहेत. कोरोना झालेल्यांतही संयतपणे उपचार घेऊन घरी जाणारे, दुसरे टेस्ट नको म्हणणारे, तिसरे अस्वस्थ झालेले असे तीनप्रकारचे लोक आहेत. या सर्वांनी संयम पाळावा. मानसिक अवस्था व्यवस्थित ठेवा. व्यायाम करा. सोशल डिस्टन्सिंग, आहार व झोप नीट घ्या. व्यसनांपासून दूर राहा. मनात कोरोनाबाबत क्षुल्लकीकरण करू नये. निर्देशांचे पालन करावेच. कोरोनाबाबत महाभयंकरीपणाही करू नका. अस्वस्थ होऊ नका. उदासीनता बाळगू नका. जास्तच बेचैन राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- डॉ. अमोल देशमुख, मानसोपचार तज्ज्ञ

संपादन - गणेश पिटेकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Don't Fear Corona Virus