esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार, जीवन संघर्ष उर्दूतून 

डॉ. आंबेडकरांचे लेखन आणि भाषण यांच्यावर आधारित पाच खंडांत उर्दूतून पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ही पुस्तके दिल्लीतील वर्ल्ड बुक फेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. या पुस्तकांची संख्या कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती आहे.

बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार, जीवन संघर्ष उर्दूतून 

sakal_logo
By
शेखलाल शेख


औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी विचार, त्यांचे लिखाण मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत मोठ्या प्रमाणात आहे. आता त्यांचे हेच लिखाण तसेच विचार उर्दू भाषेतून पुढे येत आहेत. उर्दूतून लिखाण केलेल्या या साहित्याला उर्दू भाषिकांची विशेष पसंती आहे. यामध्ये उर्दूतील संविधानाचे पुस्तक मिळविण्यासाठी तर सर्वांची धडपड सुरू असते. 

डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित उर्दूतील पुस्तके रीड ॲण्ड लीड फाउंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांच्याकडे आहेत. यामध्ये ‘डॉ. बाबासाहेब हय्यात व कारनामे’ हे पुस्तक असून याचे लेखक ॲड. सय्यद शाह गाजीउद्दीन आहेत. यात डॉ. आंबेडकर यांच्या जीवन, संघर्षावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. या पुस्तकाला मोठी मागणी आहे. 

डॉ. आंबेडकरांचे लेखन आणि भाषण यांच्यावर आधारित पाच खंडांत उर्दूतून पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ही पुस्तके दिल्लीतील वर्ल्ड बुक फेअरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. या पुस्तकांची संख्या कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती आहे. आंबेडकरांचे विचार क्रांतिकारी आहेत.

हेही वाचा- पोस्टातून मिळणार जनधनचे पैसे

त्यांनी कायदा, नागरी हक्क, शेती-पाणी, महिला, अर्थ, जाती आणि धर्मव्यवस्था, परराष्ट्र धोरण, निवडणुका, संविधान, न्याय, हक्क अशा विविध विषयांवर लिखाण केले आहे. हे विचार उर्दूतून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘दस्तुर हिंद के मेअमार डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक ख्वाजा अब्दुल मुंतकिम यांनी लिहिले आहे. यामध्ये बाबासाहेब किती विख्यात विधिज्ञ होते, यावर सविस्तर लिखाण आहे. यासोबत उर्दूतील संविधानाला सर्वाधिक मागणी आहे. 

उर्दू मासिक ‘बच्चों की दुनिया’ 

उर्दू मासिक ‘बच्चों की दुनिया’ हे राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद दिल्लीअंतर्गत प्रकाशित केले जाते. हे मासिक लहान मुलांसाठी असून यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणातील घटना, त्यांनी घेतलेले शिक्षण, जीवनातील संघर्ष प्रकाशित झालेले आहेत. अशी तब्बल पाच हजारपेक्षा जास्त मासिके औरंगाबाद शहरात वाटप करण्यात आली. तसेच उर्दू दुनिया मासिकाने बाबासाहेबांच्या जीवनावर २०१७ मध्ये विशेषांक काढला होता. 

बाबासाहेबांचे विचार हे उर्दूतून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. बाबासाहेबांचे विचार प्रकाशित केल्यानंतर ‘बच्चों की दुनिया’ या मासिकाच्या पाच हजार प्रती वाटल्या होत्या. तसेच शाळांमधून विद्यार्थ्यांना बाबासाहेबांविषयी माहिती दिली जात आहे. 
- मिर्झा अब्दुल कय्युम नदवी, रीड ॲण्ड लीड फाउंडेशन 
 

go to top