अतिवृष्टीग्रस्तांच्या तलाठी दरबारी चकरा, पैठण तालुक्यातील पंच्याऐंशी हजार शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत !

हबीबखान पठाण 
Friday, 27 November 2020

शासनाने वर्ष २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व पुरामुळे बहुवार्षिक व आश्वासित सिंचनाखालील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित पिकांसाठी आर्थिक मदत जाहीर केली.

पाचोड (औरंगाबाद) : दिवाळीपूर्वीच अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांच्या थेट खात्यात आर्थिक मदत जमा करण्याची घोषणा फोल ठरली आहे. अनेक दिवसांचा काळ उलटला, तरी अद्याप मदत न मिळाल्याने पैठण तालुक्यातील दहामंडळातंर्गत ८५ हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांची फरफट सुरू आहे.

तलाठी व तहसील दरबारी शेतकऱ्यांच्या चकरा सुरु असून तलाठीवर्गाकडून खातेदारांचे खाते क्रमांक जमा करण्यास दिरंगाई होत असल्याने स्वतः तहसिलदार चंद्रकांत शेळके यांनी याची गांभीर्याने दखल घेत आठवडाभरात सर्व खातेदारांना अनुदान वाटप करण्याच्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊन लाभार्थ्यांचे बँक खाते क्रमांक व बाधित क्षेत्राच्या गावनिहाय याद्या तातडीने तहसिल कार्यालयात जमा करण्याचे तलाठी व कृषी विभागास आदेश दिले.

शासनाने वर्ष २०२० च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व पुरामुळे बहुवार्षिक व आश्वासित सिंचनाखालील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित पिकांसाठी आर्थिक मदत जाहीर केली. जिरायती व आश्वासित सिंचनाखालील नुकसानीसाठी १० हजार रुपये प्रतिहेक्टर तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत अनुज्ञेय केली.

या निधीच्या वितरणासाठी तातडीने बाधित क्षेत्र आणि शेतकरी संख्या याप्रमाणे यादी तयार करण्याचे काम पैठण तहसील कार्यालयाच्या वतीने तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकाकडे सोपविण्यात आले होते. यासाठी शासनाकडून पैठण तालुक्यासाठी पहिल्या टप्प्यात ३७ कोटी २५ लक्ष २८ हजार रुपये दिवाळीपूर्वी तहसीलच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे वर्ग करण्यात आले.

शासनाने दिवाळी पूर्वीच सदरील रकमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून दिवाळीचा गोडवा वाढविण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांचे पिक पाहणी अहवालासह बँकेचे खाते क्रमांक जमा करून तहसील कार्यालयात दाखल करण्याची जबाबदारी तलाठ्यावर सोपविण्यात आली होती. परंतु तलाठ्यांनी ही जबाबदारी त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या 'झिरो' तलाठ्याकडे सोपवून वरकमाई करून घेतली. त्यांचा रुबाब व तोरा तहसिलदारापेक्षाही अधिक वाढल्याचे पाहवयास मिळाले. अन् दिवाळी होऊन १० दिवसांपेक्षा अधिक  कालावधी उलटला तरी अद्याप एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा झाली नाही.

पैठण तालुक्यातील पाचोड (बु), पैठण, विहामांडवा, आडूळ, लोहगाव, बालानगर, बिडकीन, पिंपळवाडी, नांदर, ढोरकीन या १० मंडळाअंतर्गत ५७ सज्जे असून १८९ गावात ८५ हजार २८३ खातेदार आहेत. या सर्वांना शासनाच्या आर्थिक मदतीची प्रतिक्षा लागून आहे. दीड महिन्यापासून केवळ लाभार्थ्यांची खाते क्रमांक जमा करुन याद्या बनविण्याचा तलाठ्यांकडून फोर्स केला जात आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील मदत वाटपाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. पैठण तालुक्यात हे काम रखडल्याचे पाहावयास मिळते. शेतकरी दररोज तलाठी सज्जापासून तहसिल कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. तलाठ्याची उदासिनताच केवळ अनुदान वाटपास जबाबदार असल्याचे शेतकरी अनिस पटेल, मंगलबाई पाचोडे, माधव ठोके यांनी सांगितले.

यासंबंधी तहसिलदार चंद्रकांत शेळके म्हणाले, 'मी तलाठी, मंडळ अधिकाऱ्याच्या बैठका घेऊन अनुदान वाटपाच्या सूचना दिल्या. चुकीच्या लाभार्थ्यांना पैसे जाऊ नये म्हणून जुन्या व नव्या याद्या तपासणी करण्यात येवून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे सोडण्यात येत आहे. चालू आठवड्यात सर्वांच्या खात्यावर अनुदान वितरीत करण्यात येईल.

नायब तहसीलदार 'तथा'आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख अरुण पंडूरे म्हणाले, दिवाळीच्या दोन दिवसाअगोदर तहसीलकडे अनुदानाचे तीस कोटी रुपये जमा झाले. नुकसानीचे पंचनामे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, क्षेत्र यांची जुळवा-जूळव करण्यास वेळ लागत आहे. दोन दिवसांत हे सर्व करणे शक्य नाही. पंधरा दिवसांत अनुदान वाटप करण्यात येईल.

संपादन - सुस्मिता वडतिले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eighty five thousand farmers in Paithan taluka are waiting for help due to lack of help