Fastag Update: Fastag नव्हे Slowtag! औरंगाबाद - जालना महामार्गावरील लाडगाव टोलनाक्यावर पूर्णपणे फास्टॅग नाही

संतोष शेळके
Tuesday, 16 February 2021

15 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व वाहनचालक आणि वाहतूक चालकांना फास्टॅक बंधनकारक असल्याचे आदेश एमएसआरडीसीने काढले होते

करमाड (जि.औरंगाबाद): 15 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व वाहनचालक आणि वाहतूक चालकांना फास्टॅक बंधनकारक असल्याचे आदेश एमएसआरडीसीने काढले होते. दरम्यान, याबाबत औरंगाबाद-जालना महामार्गावरील लाडगाव (जिल्हा औरंगाबाद) टोलनाक्यावर मंगळवारी (ता.16) फास्टॅग नसलेल्या  कुठल्याच वाहनावर कारवाई होत नव्हती. नेहमीप्रमाणे सर्व वाहन चालक टोल फीस रोख अथवा इतर साधनांद्वारे अदा करीत असल्याचे दिसून आले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यामध्ये 100% फास्टॅग वापरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व टोल नाक्यांवर विनाफास्टॅग वाहन आढळल्यास सुरूवातीला वाहनचालकांना त्याच टोल नाक्यावर फास्टॅग लावून घेणे अनिवार्य आहे. सोमवारपासून (ता.15) तर फास्टॅग नसल्यास दंडाच्या स्वरूपात दुप्पट टोल वसूल करण्याचे आदेशही संबंधित विभागाच्या वतीने काढण्यात आले आहेत. त्यामुळे आता फास्टॅग नसल्यास, दुप्पट टोल भरण्याची तयारी वाहनचालकांना ठेवावी लागणार असल्याचे बोलले जात असताना लाडगाव येथील औरंगाबाद-जालना टोलवेज कंपनीच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या टोल नाक्यावर याबाबत कुठलीच प्रणाली अस्तित्वात नव्हती. त्यामुळे वाहन धारकांकडे बोट दाखवून चालणार नसल्याचे स्पष्ट होते. जो तो वाहनचालक दररोज प्रमाणे ये-जा करत होता.

'गुणवत्तापूर्ण कामे करा, जिल्ह्याअंतर्गत विकासकामांवर भर द्यावा'

याबाबत कंपनी प्रशासनाच्या व्यवस्थापकाकडे विचारणा केली असता, त्यांनी काहीही सांगण्यास नकार देत हा रस्ता राज्य महामार्ग असुन तो एमएसआरडीसीच्या अखत्यारित येत असल्याने त्या विभागाच्या संबंधित अधिकारी यांना विचारा एवढेच उत्तर दिले. 

आम्ही खेडेगावातील आहोत, फास्टॅग हा शब्द आमच्या परवलीचा नाही. मात्र, काही दिवसांपासुन सारखे या बाबत ऐकवात येत असल्याने नाक्यावर याची उपलब्धता केल्यास सोईचे होईल. - श्रीराम भेरे , खासगी चारचाकी वाहनचालक.

 

आमची मालवाहतुक ट्रक असल्याने  प्रवास दुरचा असतो. त्यामुळे रोख रक्कम बाळगणेही धोक्याचे असते. त्यामुळे फास्टॅग सोईचेच आहे. - नरहरी अक्कम , ट्रकचालक.

 

आमच्यासाठी फास्टॅग सोईचे आहे. परंतु मीच मालक व मीच चालक असे असल्याने प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅग देण्यात यावा. - संजय निकम, ट्रेलर चालक.

(edited by- pramod sarawale) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fastag Update Aurangabad breaking news no fastag at Ladgaon toll plaza on Aurangabad Jalna highway