esakal | प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी चोरली सोन्याची बिस्किटे, प्रियकर अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_33

उघड्या घरातून कपाटात ठेवलेले तीस हजार रुपयांच्या रोख रकमेसह २० हजारांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्याला सिडको पोलिसांनी शुक्रवारी (ता.२०) रात्री अटक केली.

प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी चोरली सोन्याची बिस्किटे, प्रियकर अटकेत

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : उघड्या घरातून कपाटात ठेवलेले तीस हजार रुपयांच्या रोख रकमेसह २० हजारांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्याला सिडको पोलिसांनी शुक्रवारी (ता.२०) रात्री अटक केली. विशेष म्हणजे चोरट्याने प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी दीड ते दोन महिन्यांपूर्वी गजानननगर येथील एक घर फोडून एक लाख ६० हजार रुपये किमतीचे ३२ ग्रॅम वजनाची दोन सोन्याची बिस्किटे चोरल्याची कबुली दिली. तसेच ती बिस्किटे मुकुंदवाडी परिसरातील एका ज्वेलर्सला विक्री केल्याची देखील त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सदरील बिस्किटे जप्‍त केली. प्रथमेश ऊर्फ प्रेम दत्तप्रसाद व्यास (२०, रा. एन-१, सिडको) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात विकास गोरखनाथ खटके (३२, रा. एन-१०, पोलिस कॉलनी, टीव्ही सेंटर) यांनी फिर्याद दिली. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना २० नोव्हेंबर रोजी हद्दीत गस्तीवर असणाऱ्‍या पोलिसांना एन-पाचमधील सावरकरनगर येथे आरोपी प्रथमेश ऊर्फ प्रेम व्यास हा एका घराचे कुलूप तोडताना दिसला. पोलिसांनी त्याला पकडून चौकशी केली असता त्याने १५-२० दिवसांपूर्वी एन-१० सिडको भागात चोरी केल्याचे सांगितले. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला रविवारपर्यंत (ता.२२) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. यू. न्याहारकर यांनी शनिवारी (ता.२१) दिले. या प्रकरणात सहायक सरकारी वकील गौतम कदम यांनी सरकारतर्फे काम पाहिले.


प्रेयसीसोबत ब्रेकअप
पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केल्यानंतर शनिवारी (ता.२१) त्याला विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता त्याने प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी दीड-दोन महिन्यांपूर्वी गारखेडा परिसरातील गजानननगर येथील शिंदे यांच्या घरी चोरी करून दोन सोन्याची बिस्किटे लांबविल्याची कबुली दिली. मात्र, काही दिवसांनंतर प्रथमेशचे तिच्या प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्याचे देखील त्याने सांगितले.

संपादन - गणेश पिटेकर