हर्षवर्धन जाधव यांना राज ठाकरे मनसेत घेणार का

हर्षवर्धन जाधव यांना राज ठाकरे मनसेत घेणार का

औरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघातून 2009 मध्ये मनसेचे आमदार राहिलेल हर्षवर्धन जाधव यांनी राज ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेत मनसे सोडले होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन 2014 मध्ये विधानसभा गाठली होती. शिवसेना आमदार असतांना स्वःपक्षातील नेत्यांसोबत खटके उडाल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. आता पुन्हा एकदा हर्षधर्वन जाधव यांनी मनसेचा झेंडा हातात घेण्याची तयार केली आहे. मात्र राज ठाकरे हे हर्षवर्धन जाधव यांना पुन्हा एकदा पक्षात घेणार का ? हा प्रश्‍न आहे.

शिवसेनेला जय महाराष्ट्र करून बाहेर पडलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शनिवार (ता.18) रोजी भेट घेतली. मनसे सोबत आपल्या पुन्हा काम करण्याची इच्छा जाधव यांनी राज ठाकरे यांच्या सोबतच्या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती आहे. मात्र त्यांचा पक्ष प्रवेश होईल का यावर कोणती ही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

कन्नड विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभव झाल्यापासून जाधव हे राजकारणापासून अलिप्त होते. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती सभापती निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या सदस्यांना फोडत भाजपने आपला सभापती आणि उपसभापती केला. यावरून सध्या जाधव यांनी आपले सासरे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरच आरोप करत खळबळ उडवून दिली होती.

2009 मध्ये होते मनसेचे आमदार 

जिल्हा परिषदेचे सदस्य असलेल्या हर्षवर्धन जाधव यांना 2009 मध्ये सर्वप्रथम आमदार होण्याची संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच मिळाली होती. आमदार झाल्यानंतर ते खुपच चर्चेत होते. आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या औरंगाबाद दौऱ्यात वेरुळ जवळ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गाडी टाकण्याचा प्रयत्न केल्याने हर्षवर्धन जाधव यांना पोलीसांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. हे प्रकरण, त्यांचा मतदार संघ राज्यभर गाजला होता. 

राज ठाकरे त्यावेळी म्हणाले होते " मौका सब को मिलता है' 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावेळी हर्षवर्धन जाधव यांची बाजू घेत औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सरकारच्या निषेधार्थ सभा घेत "मौका सब को मिलता है' अशा शब्दांत तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र नंतर राज ठाकरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्या दुरावा वाढला. पक्षाने आपल्याला वाऱ्यावर सोडले असा आरोप करत हर्षवर्धन जाधव यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत 2014 ची विधानसभा निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती.

मराठा आंदोलनात सहभाग 

जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभाग नोंदवत शिवसेनेच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. एकनाथ शिंदे यांनी आपल्याला मराठा आरक्षणावर बोलू नका असे सांगितल्याचा आरोप देखील जाधव यांनी जाहीरपणे केला होता. हे प्रकरण सुद्धा राज्यभर चर्चेली गेले. एवढेच नाही तर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारा विरुध्द लढत शिवसेनेच्या पराभवाला देखील जाधव हेच कारणीभूत ठरले होते. स्वःताचा शिवस्वराज्य बहुजन पक्ष काढत त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची देखील घोषणा केली होती. मात्र त्यांना 2019 मध्ये कन्नड विधानसभा मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले. 

राज ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष 

हर्षवर्धन जाधव हे पाच वर्ष मनसेमध्ये होते. त्यामुळे त्यांच्या स्वभावाचा अनुभव मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील अनुभवलेला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कालांतराने जाधव यांनी त्याच पक्षातील राज्य व स्थानिक नेत्यांबद्दल उघडलेली मोहिम, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात घेतलेली भूमिका, आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पुन्हा मनसे सोबत जाण्याची व्यक्त केलेली इच्छा या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे यांनी जाधव यांना भेट दिली असली तरी पक्ष प्रवेशाबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

23 च्या मेळाव्यात प्रवेश होईल का ? 

मनसेच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार मुंबईत 23 जानेवारी रोजी होणाऱ्या पक्षाच्या अधिवेशनात अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, नेत्यांचा मनसेत प्रवेश होणार आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. कदाचित याच वेळी हर्षवर्धन जाधव यांची देखील मनसेत घरवापसी होऊ शकते. अर्थात अंतिम निर्णय राज ठाकरे हेच घेतील असेही सांगण्यात येत आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com